वसई : नालासोपाऱ्यात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. यावेळी त्याच्या कडून १८ लाख ४३ हजारांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तुळींज पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन देशाचे नागरिक बेकायदेशीरित्या वास्तव्य करत आहे. यातील अनेक नागरिक अमली पदार्थांच्या व्यवहारात सहभागी असल्याचे उघड होऊ लागले आहे.
नुकताच नालासोपारा पूर्वेच्या सेंट्रल पार्क परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राहुल फड यांना मिळाली होती. याबाबत पोलिसांनी तपास करत चुक्वू एमेका जॉन पॉल (४८) या नायजेरियन नागरिकाला अटक केली. यावेळी त्याच्याकडून ९ लाख ५२ हजार किंमतीचे मेफेड्रॉन (एम. डी.), ८ लाख ९१ हजार किंमतीचे एमडी नावाचा अमली पदार्थ असा एकूण १८ लाख ४३ हजारांचा माल जप्त करण्यात आला. पॉल हा मूळचा नायजेरियन असून नवी मुंबईच्या खारघर येथे वास्तव्यास होता. त्याच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगुले श्रींगी, तुळींज विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस निरीक्षक आनंद पेडणेकर, बाळासाहेब बनकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल फड, आणि पोलीस शिपाई आजिनाथ गिते आदींच्या पथकाचे गेली.
नालासोपारा बनले अमली पदार्थांचे केंद्र
मागील काही महिन्यात नालासोपारा येथील विविध भागात अमली पदार्थांच्या तस्करी होण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहे. आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. यात नायजेरियन नागरिकांचा वाढता सहभाग असल्याचे आढळून आले आहे. या अमली पदार्थांच्या खरेदी विक्रीच्या घटनांमुळे नालासोपारा हे अमली पदार्थांचे केंद्र बनू लागले आहे.