परवानगीसाठी रेल्वे प्रशासनाकडे पालिकेचा प्रस्ताव
वसई : नायगाव पूर्वेतील भागात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पालिकेकडून अमृत योजनेतून २०० मी मी व्यासाची जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. परंतु रेल्वे मार्गामुळे या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे आवश्यक परवानगीसाठी पालिकेकडून प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
नायगाव पूर्वेतील भागात झपाटय़ाने नागरीकरण होत असून लोकसंख्या एक लाखाच्या घरात गेलेली आहे. या भागात पालिकेकडून पाणीपुरवठा केला जात असून टप्प्याटप्प्याने परिसरातील सोसायटय़ांना रीतसर मंजुरीनंतर नळ जोडण्या देण्यात येत आहे. परंतु सध्या कार्यान्वित असलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ३०० मी. मी व्यासाची जलवाहिनी जुनी असल्याने अधूनमधून ती नादुरुस्त होत आहे. याचा परिणाम हा येथील पाणी पुरवठय़ावर होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन महापालिकेने अमृत योजनेतून वसई पूर्वेतील भोयदापाडा ते नायगाव पूर्वपर्यंत २०० मि.मी. व्यासाची नवीन पाइपलाइन अंथरण्यात आलेली आहे. परंतु बराच काळ लोटूनही ही जलवाहिनी कार्यान्वित झाली नाही. यामुळे जुन्याच जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू आहे.
सध्या जुन्या असलेल्या एकाच जलवाहिनीवर नळ जोडण्यांची संख्या वाढत आहे. यामुळे पाणीपुरवठय़ामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, जलवाहिनी वारंवार नादुरुस्त होणे, दूषित पाणी पुरवठा होणे इत्यादी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यासाठी पालिकेने अमृत योजनेअंतर्गत २०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. परंतु जलवाहिनी पुढे नेण्यासाठी टीवरी रेल्वे फाटक मध्ये असल्याने अडथळे निर्माण होऊ लागले आहे. ही जलवाहिनी पुढे नेण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाची परवानगी मिळणे आवश्यक आहे.
ही परवानगी मिळावी यासाठी पालिकेची अधिकारी व स्थानिक माजी सभापती कन्हैया भोईर यांनी प्रत्यक्ष या ठिकाणची पाहणी केली आहे. यानुसार आराखडा तयार करून परवानगी संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
अमृत योजनेतून अंथरण्यात आलेल्या जलवाहिनी कार्यान्वित व्हावी यासाठी पालिकेशी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तसेच रेल्वेकडून परवानगी प्राप्त झाल्यानंतर जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन नायगाव पूर्वेतील नागरिकांना सुरळीत व योग्य दाबाने पाणीपुरवठा होऊ शकेल.
– कन्हैया भोईर, माजी सभापती प्रभाग समिती ‘जी’
जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरूच आहेत. रेल्वे मार्गातून जलवाहिनी पुढे नेण्याचे काम बाकी आहे. त्यांची परवानगी मिळावी यासाठी रेल्वेच्या प्रशासनाला हा प्रस्ताव तयार करून पाठविला जाईल.
– सुरेंद्र ठाकरे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग महापालिका