वसई : वसई विरारमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने सुप्रसिद्ध असलेल्या अर्नाळा, राजोडी समुद्र किनाऱ्यावर वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले आहे. बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या वाळू उपशामुळे  समुद्रकिनाऱ्यांची धूप होऊन समुद्र किनारे खचू लागले आहेत. तर दुसरीकडे येथील पर्यटन ही धोक्यात आले आहे. असे असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

वसई पश्चिमेतील परिसरात विस्तीर्ण असे समुद्र किनारे आहेत. तसेच आजू बाजूचा परिसर हा फळबागा, झाडांमुळे निसर्गरम्य असल्याने वसई विरार शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. अर्नाळा, नवापूर, भुईगाव, राजोडी, सुरुची, कळंब, रानगाव हे समुद्र किनारे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे  सुट्टीच्या दिवशी मौज मज्जा करण्यासाठी या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. मात्र याच समुद्र किनाऱ्यावर वाळू उपसा केले जात असल्याचे प्रकार घडू लागले आहेत.

खाडी किनाऱ्या लागूनच वाळू उपसा करण्यास बंदी घातलीआहे. मात्र त्यातच समुद्र किनाऱ्यांच्या भागात छुप्या मार्गाने अनिर्बंध वाळू उपसा करण्याचे प्रकार समोर येत आहेत. अर्नाळा, राजोडी, नवापूर येथील किनाऱ्यावर सातत्याने हजारो ब्रास वाळूचे उत्खनन करून ती गोण्यात भरून नेली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. नव्याने तयार केलेल्या अर्नाळा जेट्टीच्या भागातून ही वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जेट्टीचा भाग खचून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वाळू उपश्यासाठी होत असलेल्या उत्खननामुळे हळूहळू लाटांच्या तडाख्याने किनार पट्टीचा भाग खचून किनाऱ्यावर खड्डे तयार होत आहेत. त्यामुळे किनाऱ्यांची उंच सखल अशी स्थिती निर्माण होत आहे.त्यामुळे पर्यटक बुडून मृत्यू होण्याच्या घटना ही घडत आहेत. समुद्र किनार पट्टीच्या भागात वाळू उपसा करण्यास कोणत्याही प्रकारची परवानगीनसताना सर्रासपणे वाळू उपसा होत असतो. त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिक करू लागले आहे. विशेषतः प्रशासनाने अशा किनाऱ्यावर लक्ष देऊन जे बेकायदेशीर मार्गाने वाळू उपसा करतात त्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

पर्यटन स्थळ धोक्यात

मागील काही वर्षात वसईच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांचा ओढा वाढला आहे. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. मात्र वाळू उपसा सुरूच राहिल्याने येथील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले समुद्र किनारे धोक्यात येत आहेत. वीकेंडला या भागामध्ये विविध परिसरातून हजारो पर्यटक येत असतात. ते पोहण्यासाठी समुद्रात उतरतात. भरतीच्या वेळेत पाण्यामुळे अंदाज न आल्यामुळे सदर खड्ड्यांमध्ये पडून दुर्दैवी घटना घडल्या आहेत. असे असतानाही वाळू उपशावर कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

बेकायदेशीर मार्गाने वाळू उपसा केला जात असेल अशा ठिकाणी मंडळ अधिकारी, तलाठी यांना सांगून पाहणी करून कारवाई केली जाईल. – शेखर घाडगे, उपविभागीय अधिकारी वसई.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाचूबंदर समुद्र किनारी वाळू उपशाचे प्रकार

वसईच्या पाचूबंदर समुद्र किनारी बेसुमार वाळू उपसा केला जाऊ लागला आहे. याचा परिणाम हा किनाऱ्यासह किनाऱ्यालगत असलेल्या घरांना होऊ लागला आहे. याशिवाय किनार पट्टीचा परिसर खचून पर्यावरणाचा ऱ्हास  होऊ लागला आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या भागातील खाडीत विविध प्रकारच्या मत्स्य प्रजाती कोळंबी, बोये, निवटी, खेकड आढळून येत होत्या. वाळू उत्खननामुळे किनार पट्टीचा परिसर नष्ट होत असल्याने या मत्स्य प्रजातींचे प्रमाण कमी होऊन त्याचा परिणाम दैनंदिन मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमारावर होण्याची शक्यता असल्याचे कोळी युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष मिल्टन सौदीया यांनी सांगितले आहे. तसेच अशा वाळू उपाशामुळे सागरी सुरक्षेला ही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही त्यांनी सांगितले आहे.