वसई: विरार पूर्वेच्या मनवेलपाडा परिसरातील पदपथांवरील गटारांची झाकणे तुटल्यामुळे तसेच काही ठिकाणची झाकणे नाहीशी झाल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच तुटलेल्या झाकणांमुळे अपघात होऊन एका पादचाऱ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे उघड्या गटारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विरार पूर्वेकडे मनवेलपाडा परिसर आहे. या भागात सांडपाणी निचरा होण्यासाठी गटारे तयार केली आहेत. त्यावरच पदपथ ही तयार करण्यात आली आहेत. या परिसरातून दररोज मोठ्या संख्येने पादचारी आणि प्रवासी ये-जा करत असतात. या भागातील बँक ऑफ बडोदाजवळ रस्त्यावरील फुटपाथवर अनेक ठिकाणी गटारांची झाकणे तुटलेली आहेत किंवा पूर्णपणे उघड्या अवस्थेत आहेत. यामुळे पादचाऱ्यांना चालताना मोठी कसरत करावी लागते. याच तुटलेल्या झाकणांमुळे चालत असलेला एक प्रवासी गटारात पडून जखमी झाला. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर सातत्याने गटारावर बसविलेल्या झाकणांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे.
याभागातबँक, दुकाने आणि रहिवासी वस्ती जवळच असल्याने या फुटपाथवर नेहमीच गर्दी असते. त्यामुळे महापालिकेने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन गटारांची तुटलेली झाकणे तातडीने बदलून द्यावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
