वसई: वसई , विरार रेल्वे स्थानकातून प्रवास करतांना प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांचा मंगळवारी पालघरचे खासदार डॉ हेमंत सवरा यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्राथमिक सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात व निर्माणाधिन कामाचे योग्य ते नियोजन करावे अशा सूचना रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे.

पश्चिम रेल्वेवरील वसई, नालासोपारा आणि विरार स्थानकातून दररोज २० ते २५ लाख इतके विरार ते चर्चगेट असा प्रवास करतात. यात नोकरदार वर्ग, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी यासह इच्छित ठिकाणी जाणारे प्रवासी यांचा समावेश आहे. मात्र रेल्वे स्थानकात वाढत्या गर्दीसोबतच विविध प्रकारच्या समस्या ही वाढू लागल्या आहे. रेल्वे स्थानकात प्रवेश करताना व रेल्वे स्थानकात शौचालयाचा अभाव, अपुरी फलाटांची उंची,निर्माणाधिन कामांचे नियोजन शून्य काम, भुयारी मार्गात घाणीचे साम्राज्य, भटक्या श्वानांचा त्रास, अपुऱ्या तिकीट खिडक्या, सातत्याने बंद असलेले सरकते जिने अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचा फटका दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे.

याबाबत पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्याकडे प्रवाशांनी केल्या होत्या. त्याच अनुषंगाने मंगळवारी वसई व विरार या दोन्ही रेल्वे स्थानकांचा खासदारांनी आढावा घेतला. यावेळी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व स्टेशन मास्टर, भाजपच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील यासह इतर कार्यकर्ते होते. रेल्वे स्थानकात निर्माणाधिन कामे सुरू आहेत. त्यामुळे फलाटावर जागा अपुरी झाल्याने प्रवाशांना अडचणी येत आहेत. याशिवाय त्या कामाचे साहित्य ही अस्ताव्यस्त अवस्थेत पडून आहेत. मात्र ती कामे करताना काळजीपूर्वक करण्यात यावीत अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. याशिवाय शौचालय, सरकते जिने व इतर समस्या आहेत त्यांची माहिती घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसई टर्मिनलच्या कामाला गती

वसईतून मोठ्या संख्येने प्रवासी बाहेरगावी प्रवास करत असतात. परंतु येथील नागरिकांना बाहेरगावी जाण्यासाठी वांद्रे, कुर्ला, दादर आणि सीएसटी रेल्वे स्थानकात जावे लागते. यासाठी वसई रेल्वे स्थानकात टर्मिनल तयार करण्यात येत आहे. या कामाला गती मिळून हे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सांगितले आहे.