वसई : वसईतील कामण येथील जिल्हापरिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार पालकांनी शिक्षणविभागाकडे केली आहे. पण, यावर तात्काळ कारवाई न झाल्यामुळे अखेर संतप्त झालेल्या पालकांनी सोमवारी जिल्हा परिषद शाळेला टाळे ठोकत आंदोलन केले आहे.

वसई पूर्वेच्या भागात कामण जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. कामण हा आदिवासीबहुल भाग असल्यामुळे परिसरातील बहुतांश विद्यार्थी या शाळेत शिकण्यासाठी येतात. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या बदली प्रक्रियेमुळे जिल्हापरिषद शाळेतील पाच वर्गांना शिक्षकच नसल्याची बाब समोर आली आहे.

कामण येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत सद्यस्थित १ हजार ४६ विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेत १९ शिक्षक असणे आवश्यक आहे. मात्र, शाळेत फक्त ९ शिक्षक कार्यरत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे व रजनीकांत म्हात्रे यांनी तात्काळ शिक्षकांची भरती करावी अशी मागणी वसईच्या शिक्षण विभागाकडे केली होती.

नुकताच विरार येथे पार पडलेल्या पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात ही शिक्षक कमतरतेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तर यासंबंधी जिल्हापरिषद सीईओंशी बैठक करून तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली होती. पण, वारंवार तक्रार करूनही या समस्येवर तोडगा न निघाल्यामुळे सोमवारी संतप्त झालेल्या पालक व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेवर मोर्चा काढला. तर पुढे हा मुद्दा फक्त मोर्च्यापर्यंत सीमित न राहता संतप्त आंदोलकांनी चक्क जिल्हापरिषदेच्या शाळेला टाळे ठोकले आहे.

टाळे ठोकत आंदोलन

सातत्याने आमचा पाठपुरावा सुरू होता मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाईलाजाने आम्हाला असे आंदोलन करावे लागले अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांनी दिली आहे.

पाच शिक्षक उपलब्ध करून देणार

कामण जिल्हा परिषद शाळेला टाळे ठोकल्यानंतर तातडीने तालुक्याची पंचायत समिती खडबडून जागी झाली आहे. गटविकास अधिकारी छत्तरसिंग राजपूत यांनी तातडीने तेथील ग्रामस्थांशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून नवीन पाच शिक्षक उपलब्ध करून दिले जातील. तसेच यासंबंधी आदेश ही काढले आहेत असे आश्वासन दिले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थ आणि पालकांनी पुन्हा शाळेला ठोकलेले टाळे उघडले.