वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राडारोडा टाकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. नुकताच मांडवी पोलिसांनी विरार फाटा येथे राडारोडा टाकण्यासाठी आलेल्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणे व अस्वच्छता पसरविणे असा गुन्हा दाखल केला आहे.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मुंबई गुजरातसह इतर शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. आधीच हा महामार्ग विविध समस्यांनी ग्रासला आहे. त्यातच मागील दोन ते तीन वर्षांपासून महामार्गावर राडारोडा आणून टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. विशेषतः मुंबई यासह अन्य ठिकाणी इमारतींचा पुनर्विकास व अन्य  विकास कामे  झपाट्याने सुरू आहेत. 

त्यामुळे खोदकाम, जुनी बांधकामे तोडणे त्यामुळे मोठ्या प्रमाणात राडा रोडा बाहेर निघत आहे. या राडारोड्याची विल्हेवाट लावण्याऐवजी थेट मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई विरार शहराच्या हद्दीत आणून टाकला जात आहे.  रात्रीच्या सुमारास छुप्या मार्गाने मुंबई व अन्य भागातील राडारोड्याने भरलेली वाहने महामार्गालगत खाली केली जात आहेत. विरार फाटा ते वर्सोवा पुला दरम्यान अशा प्रकारे राडारोडा टाकला जात आहे. अशा राडारोडा टाकणाऱ्यांवर मांडवी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

नुकताच विरार फाटा येथे महामार्गावर राडारोडा टाकत असताना एका डंपर चालकाला पोलिसांनी रंगेहात पडकले आहे. प्रकाश शेषराव कासले (२४), अर्जुन गंगाराम कांबळे(२६) या दोघांना ताब्यात घेत वाहन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात वाहतुकीला अडथळा निर्माण करणे व अस्वच्छता पसरविणे असा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी सुद्धा शिरसाड – वज्रेश्वरी रोडवरील मांडवी येथे रस्त्यावर राडारोडा आणून टाकणारे दोन ट्रक चालक आणि इतर तीन जणांविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राडारोडा वाहून आणणारा ट्रक रस्त्याच्याकडेला अडकून पडल्यामुळे सदर प्रकार उघडकीस आला होता.