भाईंदर : मिरारोड येथील टारझन या डान्स बारवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी छुप्या खोलीत ठेवलेल्या आणि अश्लील नृत्य करणाऱ्या १२ मुलींची सुटका करण्यात आली. तसेच बार व्यवस्थापक, कर्मचारी यांच्यासह २१ ग्राहकांविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात डान्स बारना बंदी असून केवळ बारमध्ये महिला गायकांना गाण्याची परवानगी आहे. मात्र तरीही ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरू असल्याचे चित्र आहे. विशेषतः मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत काशिमीरा परिसरात असे बार मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत.

पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर निकेत कौशिक यांनी अशा बारवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अलीकडील काही दिवसांत अनेक बारवर धाड टाकून कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत.

याच दरम्यान, मिरा रोड येथील नाट्यगृहाशेजारी सुरू असलेल्या टारझन बारमध्ये महिलांकडून अश्लील नृत्य सादर केले जात असल्याची माहिती काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री पोलिसांच्या पथकाने छापा टाकला यावेळी ग्राहक मुलींवर पैशांची उधळण करताना आढळले. त्यामुळे संपूर्ण बारची तपासणी करून चालक-मालक व ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती काशीमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले आहे.

छुप्या खोलीतून मुलींची सुटका

छाप्यादरम्यान पोलिसांना बारमध्ये एकूण १२ मुली आढळल्या. त्यापैकी पाच मुलींना लपवण्यासाठी बार मालकाने ‘कॅविटी’ म्हणजे छुपी खोली उभारली होती. यापूर्वीही काही बार चालक अनधिकृत बांधकाम करून अशा खोल्या उभारत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सदर बांधकामावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पालिकेला पत्र पाठवले आहे.