भाईंदर : गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना आखल्या जाणार आहेत. तसेच यावेळी विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

२७ ऑगस्टपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा सण शांततेत पार पडावा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आयुक्तालयाच्या हद्दीत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यात आयुक्तालयातील संपूर्ण मनुष्यबळासोबत ३३० पोलीस, ३०० होमगार्ड आणि १ राज्य राखीव पोलीस पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

याशिवाय आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांनी गणेश मंडळे व शांतता समित्यांच्या बैठका घेतल्या आहेत. या बैठकींमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा व्हावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी तसेच गणेशोत्सव मंडळांचे सदस्य व कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी केले आहे.

महिला छेडछाड पथक नियुक्त

गणेशोत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते अशावेळी अनेकदा महिला छेडछाड व लहान मुले हरवणे, जेष्ठांना अडचणी निर्माण होणे असे प्रकार घडतात.यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर महिला छेडछाड विरोधी पथक, जेष्ठ नागरिक, लहान मुले मदत पथक तयार करण्यात आले असुन सदरचे पथक पोलीस ठाणेच्या कार्याक्षेत्रात गस्तीवर असणार आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे