वसई : शेतकऱ्यांचीम यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोटी येथे चक्काजाम आंदोलन केले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करीत महामार्ग अडवून धरला होता.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच कष्टकरी, दिव्यांग, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार यांच्या विविध प्रलंबित मागण्या सरकारने मान्य कराव्यात म्हणून राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारणार असल्याची घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली होती.

याच पार्श्वभूमीवर वसईतील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी येथे चक्काजाम आंदोलन केले. सकाळी १० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

दरम्यान, प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने उभारण्यात आलेले हे आंदोलन तब्बल तीन तास चालले. यावेळी जय जवान, जय किसानच्या घोषणा देत आंदोलकर्त्यांनी सरकारकडे प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याचे मागणी केली. तसेच अर्थसंकल्पाची प्रत जाळून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत व गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे हितेश जाधव यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण, महामार्गावर सुरु असणाऱ्या या आंदोलनांमुळे वाहनचालकांची मात्र मोठी गैरसोय झाली. मुख्य रस्त्याच्या मधोमध सुरु असणाऱ्या आंदोलनामुळे महामार्गावर चारचाकी, दुचाकी तसेच अवजड वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांना बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागले.