वसई: वसई-विरार शहरात वाढत्या स्थलांतरामुळे खासगी विकासकांकडून मोठ्या प्रमाणावर इमारतींचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या बांधकामादरम्यान निर्माण होणारा चिखल थेट रस्त्यावर सोडला जात असल्याने आणि चिखलाची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बेफिकीरपणामुळे शहरातील अनेक रस्ते निसरडे बनले आहेत. यामुळे वाहने घसरून गंभीर अपघात होण्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वसई-विरार शहराकडे स्थलांतरित नागरिकांचा ओढा गेल्या काही वर्षांत वाढला आहे. वसई पूर्व, नायगाव आणि नालासोपारा येथील औद्योगिक वसाहतींमुळे रोजगाराच्या शोधात येणाऱ्या मजुरांची संख्याही मोठी आहे. यामुळे घरांची मागणी वाढल्याने जुन्या इमारती जमीनदोस्त करून त्यांच्या जागी टोलेजंग इमारती उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. याशिवाय नवीन बांधकामे ही जोरात सुरू आहेत.
या इमारती उभारताना खासगी विकासकांकडून बांधकाम नियमांना पूर्णपणे धाब्यावर बसवले जात आहे. बांधकामादरम्यान तयार होणारा चिखल अनेक ठिकाणी वाहिनीद्वारे थेट रस्त्यावर सोडला जात आहे. त्यामुळे पाऊस नसतानाही नागरिकांना साचलेल्या चिखलातून प्रवास करावा लागत आहे. या निसरड्या चिखलावरून वाहने घसरून एकमेकांना धडकण्याची, तसेच भरधाव गाड्यांचे अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच अशा बेजबाबदार विकासकांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
बेफिकीर डंपरमुळे अपघाताचा धोका
महापालिका क्षेत्रात नवीन बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र, बांधकामस्थळावरून चिखल वाहून नेणाऱ्या, आरएमसी साहित्य वाहून आणणाऱ्या, तसेच बेकायदेशीर मातीभराव करणाऱ्या अवजड वाहनांच्या बेफिकीरपणामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल सांडत आहे. या चिखलामुळे रस्ते निसरडे होऊन त्यावरून वाहने घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी डंपर्स भरधाव वेगाने ये-जा करीत असल्याने, रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी हा धोका आणखी बळावला आहे.
