लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई- विरारमधील चिखलडोंगरी गावातील जात पंचायत प्रथा तात्काळ बंद करण्याचे आदेश वसई तहसिलदार आणि पोलिसांनी चिखलडोंगरीच्या ग्रामसंथांना केले. या प्रकरणानंतर जनजागृती करण्यासाठी तहसिलदारांमार्फत गुरूवारी गावात सभेचे आयोजन कऱण्यात आले होते. या सभेत जात पंचायतीच्या लोकांनी जाहीर माफी मागितली.

विरारच्या चिखलडोंगरी गावात मांगेला समाजात जात पंचायतची प्रथा सुरू असल्याचे प्रकरण ‘लोकसत्ताने’ उघडकीस आणले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. याप्रकऱणी अर्नाळा सागरी पोलिसांनी १७ जणांविरोधात सामाजिक बहिष्कार कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले होते. जात पंचायत हा एक सामाजिक प्रश्न असल्याने तो कायद्याने न सोडविता प्रबोधन करून सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वसईचे तहसिलदार अविनाश कोष्टी, सहाय्यक पोलीस आयुक्त मोकाशी यांनी स्थानिक नेत्यांसह गुरूवारी गावात सभा घेतली. यावेळी तहसिलदार अविनाश कोष्टी यांनी ही प्रथा कशी बेकायदेशी असून त्याचे दुष्परिणाम आणि यासंबंधीच्या कायद्याची माहिती दिली. १७ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत जर ही प्रथा कायम राहिली तर आणखी ग्रामस्थांवर गुन्हे दाखल होतील असे त्यांनी सांगितले. भारतीय कायदा आणि संविधानाचे पालन करण्याचे आवाहन तहसिलदार कोष्टी यांनी केले.

आणखी वाचा-विरारच्या जात पंचायत प्रकरणी १७ जणांविरोधात सामाजिक बहिष्काराचा गुन्हा

जात पंचायतीने मागितली माफी

चिखल डोंगरी गावात स्वांतत्र्यापासून जात पंचायत पध्दत होती. त्यामुळे आजवर कुणावरही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता. ‘लोकसत्ता’ने प्रकरण उघडकीस आणल्यानंतर गावातील जात पंचायचीच्या १७ जणांवर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे गावकरी आणि जात पंचायतीचे लोकं बिथरले आहे. आम्ही आमच्याच समाजाच्या लोकांवर बहिष्कार टाकून दंड आकारला त्याबद्दल आम्हाला माफ करा असे जात पंचातीच्या वतीने जाहीर माफी मागण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे प्रकरण

विरार पश्चिमेला असलेल्या चिखलडोंगरी गावात मांगेला समाजाचे लोकं राहतात. या गावात आजही जात पंचायत अस्तित्वात आहे. या गावातील स्वयंघोषित २०-२५ जण जातपंचायत चालवत आहेत. जात पंचायतीच्या विरोधात जाणार्‍यांना २५ हजार ते १ लाखांपर्यंतचा दंड आकारला जातो. मुरबाड तालुक्यातील सासणे येथे असलेल्या दत्ता देवस्थान वारकरी मंडळ ट्रस्ट बरोबर गावातील पंचायतीचा वाद आहे. त्यामुळे चिखलडोंगरी ग्रामस्थांना सासणेला जायला बंदी आहे. जे लोकं या सासणे गुरूपिठाशी संबंध ठेवतात त्यांना बहिष्कृत करून वाळीत टाकले जातेआणि २५ हजारांचा दंड आकारण्यात येतो.