पाणी शिरल्याने अनेक वाहनांच्या इंजिनात बिघाड; करोनाकाळातील मंदीत आर्थिक भुर्दंड

विरार : रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने अनेक इमारतींत पाणी साचून राहिल्याने वाहनांमध्ये पाणी जाऊन वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. करोनाकाळात आधीच आर्थिक मंदीचा फटका सहन करणाऱ्या वाहनधारकांना रस्त्यांवरील पावसामुळे वाहन दुरुस्तीचा आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे. आपली वाहने दुरुस्त करण्यासाठी आता पदरमोड करून नागरिक गॅरेजवर रांगा लावत आहेत.

शहरामध्ये रविवारी दाखल झालेल्या पावसाने चांगलाच जोर धरत रात्रभर तुफान फलंदाजी केली. यामुळे रविवारी सकाळपर्यंत शहरातील अनेक भागांत मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. बहुतांश सकल भागात कमरेएवढे पाणी साचल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरून सामानांचे नुकसान तर केलेच, पण त्याचबरोबर घराबाहेर उभी असलेली वाहने रात्रभर पाण्यात असल्याने वाहनात पाणी जाऊन त्यांच्यात बिघाड निर्माण झाले. यात बहुतांश चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

आधीच करोनाकाळात आर्थिक तंगीचा नागरिक सामना करत आहेत. त्यात कामावर जाण्यासाठी शासकीय प्रवास यंत्रणा नसल्याने मागील वर्षभरात अनेकांनी आपली खासगी वाहने खरेदी केली. पण रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने. वाहनांचे मोठे नुकसान केले. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच रस्त्यांवर आणि खड्डय़ात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने वाहने खड्डय़ात आपटून त्यांचे नुकसान होत आहे. खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकी वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. वाहने खराब होत असल्याने अनेकांच्या कामावर दांडय़ा लागत आहेत.

विरार पूर्व येथील जलबाववाडी परिसरातील अत्तार अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या स्नेहल कांबळे यांनी सांगितले की, त्यांच्या दोनही चारचाकी वाहनात इंजिनामध्ये पाणी गेल्याने त्यांना जवळजवळ ४० हजारांहून अधिक खर्च आला आहे. तर रिक्षाचालक मनोज पांडय़े यांनी त्यांची रिक्षा पूर्ण पाण्याखाली गेली असल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले.

त्यांना १२ हजार रुपये खर्च आला आहे. तर स्नेहा मोटर्सचे मालक सुशांत राणे यांनी माहिती दिली की, सोमवारपासून मोठय़ा प्रमाणात वाहनात पाणी शिरून वाहने खराब होत असल्याने आमच्या गॅरेजवर रांगा लावत आहेत. अनेकांकडे सध्या पैसे नसल्याचे आम्ही काही ग्राहकांचे काम उधारीतसुद्धा करीत आहोत.

करोना वातावरणामुळे रेल्वे सेवा बंद आहेत, यामुळे आम्हाला आमची खासगी वाहने घेऊन कामावर जावे लागते. पण पावसामुळे वाहने खराब झाल्याने आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे.

– रमेश नाईक, राहिवासी