वसई : वसई विरार शहरात कोसळत असलेल्या पावसामुळे कामण भिवंडी राज्य महामार्गाच्या वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. महामार्ग शेजारील पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग बंद असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहतूक ठप्प झाले आहे ज्यामुळे महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
वसई पूर्वेतून कामण भिवंडी राज्य महामार्ग गेला आहे. ठाणे तसेच भिवंडी येथून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग महत्त्वाचा समजला जातो. मात्र गेल्या काही वर्षात रस्त्याच्याशेजारी असणाऱ्या गटारांवर झालेले अनधिकृत बांधकाम, माती भराव यामुळे पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग बंद झाले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. ज्यामुळे कामण भिवंडी राज्य महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यातच सकाळपासूनच धीम्या गतीने सुरू असणारी वाहतूक पावसाचा जोर वाढल्यामुळे जवळपास ठप्प झाली आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना बऱ्याच गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तर रस्त्यावर अवजड वाहने, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. तसेच रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच गुडघाभर पाण्यातून वाट काढत घरचा रस्ता गाठावा लागत आहे.