भाईंडर :-मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे येत्या १८ जुलै रोजी मिरा भाईंदर शहरात येणार आहे. मिरा रोड येथे एका दुकानदाराला झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या स्थळापासून अवघ्या काही अंतरावर मनसेच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. ठाकरे मिरा भाईंदर शहरात येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
मिरा भाईंदर शहरात ८ जुलै रोजी मराठी भाषिक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मराठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. सुरुवातीला पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय ठाम ठेवला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या दरम्यान, पोलिसांनी एक हजारहून अधिक मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. परिणामी, हे प्रकरण चिघळले आणि त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. मोर्चेकऱ्यांची वाढती संख्या पाहता, सरकारने अखेर या मोर्चाला ऐनवेळी परवानगी दिली. हा मोर्चा मिरा रोड रेल्वे स्थानकावर शांततेत पार पडला.
या मोर्चाला मोठ्या प्रमाणात मराठी भाषिकांनी उपस्थिती दर्शवली होती, त्यामुळे शहरात नव्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले. जरी मोर्चाचे नेतृत्व मराठी एकीकरण समितीने केले असले, तरी त्यामध्ये मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिरा भाईंदर शहराला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसेच्या मिरा भाईंदर येथील नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून, या वेळी त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मराठी भाषेच्या सक्तीवरून झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या स्थळापासून हे कार्यालय अवघ्या काही अंतरावर आहे. ठाकरे मिरा भाईंदर शहरात येणार असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. याशिवाय त्यांच्या स्वागताची तयारीचे नियोजन केले जात आहे.
“मिरा भाईंदरमध्ये निघालेल्या मराठी भाषिक मोर्चाला अभूतपूर्व यश लाभले. त्यामुळे सन्माननीय राज ठाकरे १८ जुलै रोजी मिरा भाईंदरमध्ये येणार आहेत. या प्रसंगी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार असून, सभेच्या नियोजनाचे काम सुरू आहे.” — संदीप राणे, मनसे शहर अध्यक्ष