भाईंदर :- भाजपा आणि महायुतीचा गेल्या काही वर्षांपासून बालेकिल्ला ठरलेला मिरा भाईंदर मतदारसंघाकडे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लक्ष केंद्रित केले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून संघ परिवाराशी संबंधित वरिष्ठ नेत्यांची उत्तन परिसरात नेहमीच रेलचेल पाहायला मिळते. भाजपाचे वरिष्ठ नेतेही वरचेवर प्रबोधिनीमध्ये बैठका घेत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. संघाचे कार्य पूर्ण होऊन यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने श्री विजयादशमी उत्सवाच्या आयोजनासाठी यंदा भाईंदरची निवड करण्यात आली असून संघाचे वरिष्ठ कार्यवाह उपस्थित राहणार आहेत.

मिरा-भाईंदर हे शहर भाजपचा बालेकिल्ला मानले जाते. सध्या भाजपच्या मतदारांमुळे येथे महायुतीकडे खासदार, आमदार आणि महापालिकेवर एकहाती सत्ता आहे. सुरुवातीच्या काळात हा परिसर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होता. शहराचे पहिले आमदार म्हणून गिल्बर्ट मेंडोसा हे २००९ साली निवडून आले होते. त्या काळात प्रामुख्याने भाईंदरमधील आगरी-कोळी, ईस्ट इंडियन आणि मिरा रोडमधील मुस्लिम बहुल नागरिक हे त्यांचे प्रमुख मतदार होते. याच भागातील मुस्लिम समाजाची मोठी वस्ती लक्षात घेता काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांची दोन वेळा विधानपरिषद सदस्यपदी निवड झाली होती.

मात्र, २००९ नंतर वाढत्या शहरीकरणामुळे येथे प्रामुख्याने गुजराती-मारवाडी समाजातील नागरिकांची मोठी वस्ती वाढू लागली. यातील जैन समाज हा आर्थिकदृष्ट्या प्रभावी असल्याने शहरातील धोरणात्मक निर्णयात त्यांचा मोठा सहभाग वाढला. त्याच काळात नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे देशभरात उसळलेल्या भाजप लाटेचा परिणाम येथेही झाला आणि नागरिकांनी भाजपला साथ द्यायला सुरुवात केली. गुजरातच्या सीमेपासून हे शहर जवळ असल्याने भाजपने पालघर जिल्ह्याला वगळून या भागाकडे विशेष लक्ष दिले. परिणामी, २०१४ साली पहिल्यांदा भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता आमदार म्हणून निवडून आले.

या काळात प्रभाग स्तरावर भाजपची पकड घट्ट झाली असली तरी पक्षातील अंतर्गत वाद उफाळल्याने गीता जैन या अपक्ष म्हणून निवडून आल्या. मात्र, त्यांनीदेखील भाजपच्या विचारसरणीला जवळ मानणाऱ्या मतदारांना आपलेसे केले आणि विजय मिळवला. दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मेहता हे निवडून आले आहेत. दशकभरात वाढलेल्या संघटनात्मक बळाला अधिक दृढ करण्यासाठी यंदा २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी कार्यक्रम नवघर येथील सप्तेश्वर मंदिराच्या आवारात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संघाचे सह-सरकार्यवाह अतुलजी लिमये हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.