वसई: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसई तालुक्यातील आठ गणासाठी सोमवारी  आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये  वसई तालुक्यातील  भाताणे, मेढे, तिल्हेर, चंद्रपाडा, अर्नाळा, अर्नाळा किल्ला, कळंब, वासलई यांचा समावेश आहे. यामधील चार गणामध्ये महिलांचे आरक्षण राखीव करण्यात आले आहे. 

येत्या काही महिन्यात पंचायत समितीच्या निवडणुका लागण्याची शक्यता असून त्याच अनुषंगाने पंचायत समितीच्या आठ गणाची रचना करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित केला होता.  यावेळी या आठ गणांमधील पंचायत समितीच्या सदस्यांसाठी आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली  तहसीलदार डॉ अविनाश कोष्टी यांनी काढली निवासी नायब तहसीलदार राजाराम देवकाते, नायब तहसीलदार शशिकांत नाचण व अन्य अधिकारी उपस्थित होते.

यामध्ये भाताणे  आणि सकवार गणासाठी अनुसूचित जमाती महिला राखीव, तिल्हेर गण अनुसूचित जमाती, वासलई आणि अर्नाळा गण सर्वसाधारण ठेवण्यात आला आहे. तर चंद्रपाडा गण हा सर्वसाधारण महिला राखीव, अर्नाळा किल्ला हा नागरिकांचा मागास वर्ग तसेच कळंब गण नागरिकांचा मागास वर्ग महिला राखीव अशा जागा आरक्षित झाल्या आहेत. या काढण्यात आलेल्या आरक्षणात ५० टक्के जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.