भाईंदर : शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी शहरातील वाहतुकीवर निर्बंध आणण्याचा निर्णय मीरा-भाईंदर महापालिकेने घेतला आहे. यासाठी पालिका आयुक्तांनी शिक्षण विभागाला शाळा परिसरातील वाहतुकीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.

मीरा-भाईंदरमधील रस्त्यांवर वाहतूक कोंडीत वाढ होताना दिसत आहे. त्याचा फटका शालेय विदयार्थ्यांना बसतो. या कोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणे कठीण होत असल्याचे दिसून आले आहे. शिवाय वाढती वाहने आणि गर्दी यामुळे पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातही भय निर्माण होते. ही समस्या मार्गी लावण्याचा निर्धार पालिकेने केला आहे.

सध्या शहरात पालिकेच्या ३६ तर खासगी ३०२ शाळा आहेत. यातील काही शाळा सकाळच्या सत्रात तर काही दुपारच्या सत्रात भरतात. त्यामुळे शाळेच्या वेळेत अवजड वाहनांना तसेच अरुंद रस्त्यावरील दोन्ही दिशेच्या वाहतुकीवर र्निबध घालण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी शिक्षण विभागाला शहरातील शाळांच्या परिसरातील वाहतुकीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आवश्यक तेथेच हे निर्बंध घालण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीरा-भाईंदर शहरात शाळेच्या वेळेत वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. त्याचा विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे आवश्यक तेथे अरुंद रस्त्यावरील दुहेरी वाहतूक तसेच अवजड वाहनांवर शाळेच्या वेळात निर्बंध घालण्यात येणार आहेत. त्यासाठी पर्यायी मार्ग रस्ता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. – दिलीप ढोले, आयुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका