वसई: वसईत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत ससूनवघर व मालजीपाडा परिसरात उभारलेल्या  रेडिमिक्स सिमेंट कारखान्यांमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. हे प्रकल्प कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच चालविले जात होते. अखेर गुन्हे दाखल करण्यात आलेल्या २८ प्रकल्पांपैकी ७ प्रकल्पांवर कारवाई करण्यात आली असून जिल्ह्याच्या गौण खनिज भरारी पथकाने बेकायदा प्रकल्पांना टाळे ठोकले आहे. 

वसई विरारमधील राष्ट्रीय महामार्गावरील मालजीपाडा, ससूपाडा, ससूनवघर, वर्सोवा पुल परिसर यासह अन्य भागात चाळीसहून अधिक रेडिमिक्स प्रकल्प आहेत. दिवसेंदिवस या प्रकल्पांची संख्या वाढत आहे. काही प्रकल्पधारक कोणत्याही प्रकारचे नियम पाळत नाहीत. हे प्रकल्प कोणत्याही प्रकारच्या परवानग्या न घेताच चालविले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रकल्पातून निघणारी भुकटी, वाहतुकीच्या दरम्यान रस्त्यावर सांडणारा सिमेंट मिश्रित माल यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याशिवाय धूळ प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता ढासळून नागरी आरोग्यावरही याचा परिणाम होत आहे. 

तर दुसरीकडे शहराच्या अगदी वेशीवरच प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. भातशेती, फळझाडे व आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्यावर ही प्रदूषणाचा परिणाम होत असल्याने या प्रकल्पांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. याशिवाय दैनिक लोकसत्ताने ही वेळोवेळी आरएमसी प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाच्या संदर्भात वृत्त प्रसारित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. यावर वसईच्या महसूल विभागाकडून ससूनवघर व मालजीपाडा येथील २८ आरएमसी प्रकल्पांच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकल्पांचा तपास सुरू करण्यात आला होता.मात्र चार महिने उलटूनही त्यावर पुढील कारवाई होत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर मंगळवारी जिल्ह्याच्या गौण खनिज विभागाच्या भरारी पथकाने त्याठिकाणी धाड टाकत तपासणी मोहीम सुरू केली होती. यात ७ प्रकल्प धारकांकडे कोणत्याही प्रकारची आवश्यक कागदपत्रे नसतानाही हे प्रकल्प सुरू होते. यामुळे हे सातही प्रकल्प बंद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय गौण खनिज भरारी शाखेचे नायब तहसीलदार चंद्रकांत पवार यांनी सांगितले आहे.

या प्रकल्पांवर झाली कारवाई 

ससूनवघर व मालजीपाडा येथील २८ पैकी सात प्रकल्प बंद केले आहेत. एच.के.आरएमसी, ए एस.आरएमसी, सी .डी आरएमसी, एच के २ आरएमसी, नगर आरएमसी, शिव कृपा आरएमसी आणि प्रारब्ध आरएमसी यांचा समावेश आहे. तर अन्य प्रकल्पांची तपासणी सुरू आहे असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

प्रदूषण मंडळाकडून कारवाई केल्याचा दावा 

आरएमसी प्रकल्पातून निर्माण होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यानुसार नोटिस बजावल्या जात आहेत. यापूर्वी सुद्धा काही प्रकल्पांना बंदच्या नोटिस दिल्या आहेत. याशिवाय महावितरणला ही बेकायदेशीर प्रकल्पांना वीज जोडण्या देऊ नये अशा सूचना केल्या आहेत असे ठाणे-पालघर प्रदूषण नियामक मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काठोळे यांनी सांगितले आहे.

धोकादायक वाहतूक 

मालजीपाडा, ससूनवघर परिसरात आरएमसी वाहतूक करणारी वाहने ही धोकादायक पद्धतीने चालविली जातात. त्यातून काही वेळा सिमेंटचा मोठ्या प्रमाणात माल हा रस्त्यावर पडतो. त्यातून प्रदूषण वाढते तर काही वाहनचालक विरुद्ध दिशेने भरधाव वाहने चालवितात त्यावर कारवाई होत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

मालजीपाडा व ससूनवघर परिसरात बेकायदेशीरपणे आरएमसी प्रकल्प चालविले जात असल्याचे तपासणीत उघड झाले आहे. असे प्रकल्प आम्ही सील बंद केले आहेत.-चंद्रकांत पवार, नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय पालघर