वसई:  वसई विरार शहर जलमय झाल्याने रिक्षा आणि खासगी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे शहरात ट्रॅक्टर सेवा सुरू झाली आहे. नोकरदार पुरूष आणि महिला ट्रॅक्टरमध्ये स्वत:ला सावरत प्रवास करत आहेत. सर्वत्र पाणी ट्रॅक्टरचा प्रवास असे विदारत चित्र विरार, नालासोपारा आणि वसईत बुधवार पासून पहायला मिळत आहे. प्रति माणसी रिक्षाप्रमाणे दर आकारून नागरिकांची ये-जा करण्यात येत आहे.

वसई विरार भागात मंगळवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. बुधवारी सुद्धा पावसाचा जोर प्रचंड असल्याने वसई विरार मधील मुख्य रस्तेच पाण्याखाली गेले. विरार मधील बोळींज ते विरार स्थानकच्या भागातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. वसई पूर्वेच्या भागातून महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील एव्हरशाईन येथे पाणी साचून रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर नालासोपारा पूर्वेला रेल्वे स्थानकापासूनच्या परिसराला मोठ्या तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सर्वत्र जलमय स्थिती झाल्याने रिक्षा वाहतूक ठप्प झाली आहे. यासाठी बुधवार पासून शहरात ट्रॅक्टर सेवा सुरू झाली आहे.

हेही वाचा >>> वसई : छेडछाडीला कंटाळून मुलीने घर सोडले, आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी सापडली

विरारच्या बोळींज ते विरार स्थानक, वसईत एव्हरशाईन सिटी आणि नालासोपारा पूर्वेच्या स्थानकपासून तुळींज पर्यंच ही ट्रॅक्टर सेवा सुरू करण्यात आली आहे.

ये जा करण्यासाठी  अन्य कोणताही मार्ग नसल्याने वसई विरार मधील नागरिकांना ट्रॅक्टर मधून प्रवास करावा लागला आहे. भर पावसात ट्रॅक्टर वर उभे राहत, एका हातात छत्री व स्वतःचा तोल सांभाळत प्रवाशांना हा प्रवास करावा लागल्याचे चित्र दिसून आले. पावसामुळे रिक्षा बंद होत्या त्यातच काही वाहनचालक हे दुप्पट पैसे घेत होते. त्यामुळे बराच वेळ वाहनांची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागले होते. मात्र ट्रॅक्टर सुविधा मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया विरार येथील प्रवासी महिलेने दिली आहे. वसई विरार शहरातील नागरिकांना सेवा देण्यासाठी पालिकेने परिवहन सेवा सुरू केली आहे. मात्र पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते हे पाण्याखाली गेल्याने बहुतांश मार्गावर पालिकेची परिवहन सेवा ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले. परिवहन सेवा बंद असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले काहींना तर खासगी वाहतूक सेवेचा अवलंब करावा लागला.

हेही वाचा >>> विरारच्या एमबी इस्टेटमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रॅक्टरमधून प्रवास ही शोकांतिका आम्ही नालासोपार्‍यात महागडी घरे घेतली आहेत. परंतु कधी आम्हाला ट्रॅक्टर मधून घर गाठावे लागेल अशी स्वप्नातसुध्दा कल्पना केली नव्हती, अशी प्रतिक्रिया नालासोपारा येथील रहिवाशी सुरेंद्र घाग यांनी दिली. महिलांनी देखील याबाबत संताप व्यक्त केला असून ट्रॅक्टर मधून प्रवास ही शोकांतिका अशल्याचे सांगितले. ट्रॅक्टर उंच असल्याने पाण्यातून सहज मार्ग काढत असल्याने तो सोयीचा पडतो. खासगी दुचाकी आणि वाहने पाण्यात बंद पडत आहेत.