वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे.आता ही मोकाट जनावरे थेट महामार्गावरील मुख्य रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा प्रकारामुळे अपघात होण्याचा धोका अधिकच वाढला असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे. वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, वसई विरार, मीरा भाईंदर व गुजरात अशा विविध भागाला जोडणारा प्रमुख मार्ग असल्याने वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे.
याच महामार्गावर आता मोकाट जनावरांचा वावर ही मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. विशेषतः चिंचोटी ते खानिवडे टोल नाका अशा ठिकाणी ही मोकाट जनावरे फिरताना दिसून येत आहेत. काही वेळा ही जनावरे थेट मुख्य रस्त्यावर ही ठाण मांडून बसत आहेत. तर काही वेळा उड्डाणपुलाखाली ही सुद्धा गर्दी करत आहेत. या मोकाट जनावरांच्या वाढत्या वावरामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. तसेच ही जनावरे रस्त्याच्या मध्येच बसून राहत असल्याने वाहनांची धडक बसून अपघात होण्याची शक्यता असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे.
अशा मोकाट जनावरांना महामार्गवर रोखण्यासाठी संरक्षित जाळ्या सुद्धा नाहीत त्यामुळे सहज पणे ही जनावरे थेट महामार्गावर येत आहेत. तर अशा जनावरांना रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. मोकाट जनावरांना आवर घालण्यासाठी प्राधिकरणाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. महामार्गावर पेट्रोलिंग सुरूच असते. जिथे अशा प्रकारे जनावरे दिसून येतात त्यांना हटविले जाते असे महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे.
मोकाट जनावरे रस्त्यावर का येतात?
सध्या पावसाळा सुरू आहे , रान माळांवर , जंगलात हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे.मात्र असे असले तरी मोकाट गुरे वरील ठिकाणी चारा चरून महामार्गावरील रस्त्यावर येऊन रवंथ करत बसलेली दिसून येत आहेत. कारण ज्या ठिकाणी चरण्याच्या जागी विश्राम करण्याच्या जागा पावसात ओल्या व चिखलमय झाल्या आहेत. अशा ठिकाणी माशा, किडे, डास यांचा त्रास जाणवतो. यामुळे ही जनावरे मोकळ्या सुक्या जागा, उड्डाण पुलाखाली, रस्त्यावर बसलेली दिसून येत असल्याचे जाणकार नागरिकांचे मत आहे.