वसई: ऑक्टोबर महिना सुरु झाला असला तरीही शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे अजूनही पूर्ण झाली नाहीत. तर दुसरीकडे कामांसाठी पुन्हा एकदा कोट्यावधी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात रस्ते दुरुस्तीची कामे नोव्हेंबरअखेर पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत असा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.

वसई विरार शहरात यंदा झालेल्या पावसामुळे विविध ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा त्रास वाहनचालकांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना ही समोर येऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे रिक्षाचालक व दुचाकी स्वार यांना या खड्ड्यांमुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. गणेशोस्तव आणि नवरात्रोत्सवाच्या दरम्यान तरी रस्त्यांची दुरुस्ती होईल अशी आशा नागरिकांना होती.  मात्र दोन्ही सण संपले असून दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी सुद्धा रस्त्यांची दुरुस्ती झाली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

पालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे ही समस्या कायम असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. नुकताच पालिकेने शहरातील खड्डे दुरुस्ती व प्रमुख रस्त्यांचे नूतनीकरण यासाठी निविदा काढल्या आहेत. यात आठ प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरण यासाठी ५५ कोटी ७९ लाख तर इतर शहरांतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ६८ कोटी २७ लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी व प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. रस्ते दुरुस्तीची कामे पुढील आठवड्यात सुरू करून नोव्हेंबरअखेर पर्यंत पूर्ण केली जातील असा दावा महापालिकेने केला आहे.