भाईंदर :-मिरा भाईंदर शहरात रस्त्यावर पाणी सांडून रस्ते निसरडे करणाऱ्या टँकरची समस्या अद्याप कायम आहे. या टँकर चालकांविरोधात कारवाई करण्याची मागणी महापालिकेने वाहतूक पोलिसांकडे केली असतानाही, याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
शहरात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. त्यामुळे दाट लोकवस्ती आणि उचभ्रू इमारती असलेल्या भागांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात टँकरच्या पाण्यावर अवलंबून झाले आहेत. परिणामी शहरात पाण्याच्या टँकरची रहदारी लक्षणीयरीत्या वाढली आहे.
मात्र हे टँकर पाणी वाहतूक करताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे टँकरमधील पाणी रस्त्यावर सांडत असून, रस्ते निसरडे होत आहेत आणि त्यावर मातीचा घट्ट थर साचत आहे. यापूर्वी अशाच निसरड्या रस्त्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होऊन जीवितहानीही झाली आहे.
म्हणून टँकरमधून होणाऱ्या पाणी गळतीबाबत उपाययोजना आखण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने महापालिकेकडे करण्यात येत आहे. मात्र पालिका प्रशासनाला कारवाईचे अधिकार मर्यादित असल्याने, या संदर्भात वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी पालिकेकडून करण्यात आली आहे. मात्र वाहतूक पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शहरातील टँकर पाणी गळतीची समस्या कायम आहे.