भाईंदर :– हिंदू समाज जाती, प्रांत व भाषा या आधारावर विखुरलेला असल्याने संकट आल्यास त्याला भीती वाटते. असंघटित असल्यामुळे तो दुर्बळ ठरतो. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपूर्ण समाजाला एकत्र आणण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन संघाचे माजी सहकार्यवाह अतुल लिमये यांनी केले. ते भाईंदर येथील विजयादशमी निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
भाजपा आणि महायुतीचा गेल्या काही वर्षांपासून बालेकिल्ला ठरलेला मिरा भाईंदर मतदारसंघाकडे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लक्ष केंद्रित केले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून संघ परिवाराशी संबंधित वरिष्ठ नेत्यांची उत्तन परिसरात नेहमीच रेलचेल पाहायला मिळते. भाजपाचे वरिष्ठ नेतेही वरचेवर प्रबोधिनीमध्ये बैठका घेत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यंदा शताब्दी वर्ष आहे.
संघाचे कार्य पूर्ण होऊन यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संघ परिवाराकडून देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने मिरा भाईंदर शहरात गुरुवारी विजयादशमीच्या निमित्ताने नवघर येथील सप्तेश्वर मंदिराजवळ कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी मुख्य अतिथी म्हणून किरण पाटील तर प्रमुख वक्ते म्हणून संघांचे माजी सहकार्यवाह अतुल लिमये उपस्थित होते.
शस्त्रपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी बोलताना लिमये यांनी संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. हिंदू समाजाने एकत्र राहिले पाहिजे, राष्ट्रीय चारित्र्य ही संकल्पना समजून प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे, असा संदेशही त्यांनी दिला.