वसई: वसई-विरार महापालिकेने महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली होती. पण गेल्या काही काळापासून ही बससेवा बंद असल्यामुळे याचा फटका विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे ही सेवा तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.
वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे शाळकरी मुलांच्या सोयीसाठी विशेष बससेवा सुरु करण्यात आली होती. महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात ही योजना विद्यार्थ्यांना पुरवली जात होती. पण, गेल्या काही काळापासून ही विशेष बससेवा बंद असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तर महापालिकेने लागू केलेल्या नव्या अटी शर्तींमुळे बससेवा बंद केल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे.
वसई पूर्वेतील संत जलाराम बापू नगर, मिठागर हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांचा भाग समजला जातो. या भागातील बहुतांश नागरिक हे फेरीवाला, मजूर गटातून येणारे तसेच धुणी भांडी करून उदरनिर्वाह करणारे आहेत. वसई पश्चिमेतील एम.के. गुजराथी शाळेत संत जलाराम बापू नगर येथील ७५ तर मिठागर परिसरातील ४० ते ५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण, विशेष बससेवा बंद असल्यामुळे गेले १५ दिवस या विद्यार्थ्यांना शाळेत जाताना अडचणी येत असल्याने शिवसेना (ठाकरे ) माजी नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी सांगितले आहे.
सध्या महापालिकेच्या अन्य बससेवेतील वाढती गर्दी आणि विस्कळीत वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना त्यातून प्रवास करणे कठीण झाले आहे. शिवाय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पालकांना आपल्या पाल्यांना दररोज खासगी बसने किंवा रिक्षाने शाळेत पाठवणे परवडणारे नाही. त्यामुळे, महानगरपालिकेने ही विशेष बससेवा तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी ही चेंदवणकर यांनी पालिकेकडे केली आहे.
पालिकेकडून सवलतीत बस प्रवास
वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाकडून शाळेच्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बस प्रवास उपलब्ध करून दिला जात असल्याचा दावा पालिकेच्या परिवहन विभागाने सांगितले आहे. मात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या विभागातून ते शाळेपर्यंत बस सेवा देण्याची मागणी होत आहे. मात्र त्यात अडचणी येत आहेत. याबाबत ठेकेदार यांच्यासोबत देखील चर्चा सुरू असल्याचे परिवहन विभागाचा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.