विरार : मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने वसईच्या ऐतिहासिक किल्ल्याचा सागरी दरवाजा निखळला होता. याबाबत वसईकर जनता आणि दुर्ग प्रेमींमधून समाज माध्यमांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आज अखेर तातडीने भारतीय पुरात्तव विभागाकडून हा दरवाजा सुरक्षित स्थळी हलविण्यात आला असून पुन्हा त्याची दुरुस्ती करून बसविला जाईल असे सांगण्यात आले आहे.
वसई पश्चिमेला खाडी किनारी चिमाजी आप्पांच्या पराक्रमाची साक्ष असलेला ऐतिहासिक किल्ल्याला मंगळवारी मुसळधार पावसाचा फटका बसून किल्ल्याचा सागरी दरवाजा निखळला होता. बुधवारी ‘लोकसत्ता’ ने याविषयीचे वृत्त प्रसारित केले होते. याबाबत तातडीने कार्यवाही करून दरवाजा सुरक्षित स्थळी हलविला जाईल असे वसईच्या पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार आज क्रेनच्या साहाय्याने हा भक्कम सागरी दरवाजा सुरक्षित स्थळी हलविण्यात आला आहे.
पोर्तुगीज काळात उभारण्यात आलेल्या या किल्ल्यात वास्तू कलेचा उत्तम नमुना असलेली विविध चर्च, ऐतिहासिक इमारती आणि मंदिरे आहेत. १७३९ साली चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा किल्ला जिंकला होता. सुरक्षेअभावी गेल्या काही वर्षात किल्ल्यातील अनेक ऐतिहासिक पुरावे, शिल्प आदींची चोरी झाली होती. या दरवाज्याची चोरी होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याची मागणी करण्यात आली होती. आज कार्यवाही केल्याने किल्लेप्रेमींकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे आता वसईच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धनाकडे गांभीर्याने पाहिले जाईल असा विश्वासही दुर्ग प्रेमींनी व्यक्त केला आहे. दरम्यान, दुर्ग प्रेमींसह आमदार मनीषा चौधरी यांनीही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना पत्र लिहून याबाबत आदेश देण्याची विनंती केली होती.
पावसामुळे वसई किल्ल्याचा सागरी दरवाजा निखळला होता. बुधवारी दरवाजा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला आहे. वरिष्ठांकडे अहवाल पाठवला असून पाऊस थांबल्यानंतर दरवाजाची दुरुस्ती करून तो पुन्हा बसविला जाईल. -कैलास शिंदे, अधीक्षक, पुरातत्व विभाग वसई