वसई : वसई विरार शहरात बोगस डॉक्टरांच्या शोध मोहिमेला वेग आला आहे. नुकताच पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या पथकाने नालासोपाऱ्यात एका बोगस डॉक्टरवर कारवाई केली आहे. मोहम्मद नसीम खान असे बोगस डॉक्टरचे नाव असून त्याच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मागील काही वर्षापासून शहरात विविध ठिकाणच्या भागात बोगस डॉक्टर आपले दवाखाने थाटू लागले आहेत. अशा बोगस डॉक्टरांना पायबंद घालण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे.नुकताच नालासोपारा पूर्वेच्या भागात त्यांनी दोन पथके तयार करून तपासणी सुरू केली होती.याच दरम्यान नालासोपारा पूर्वेच्या संतोष भवन परिसरात असलेल्या “तसनीम हेल्थ केअर” या बेकायदेशीर दवाखान्यावर छापा टाकला. यावेळी डॉक्टरकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना एलोपॅथी उपचार करताना रंगेहात पकडण्यात आल्याचे पालिकेच्या वैद्यकीय विभागाने सांगितले आहे.
मोहम्मद नसीम खान असे या बोगस डॉक्टरचे नाव असून त्याच्याकडे केवळ बी.ई.एम.एस. (B.E.M.S.) ही पदवी आहे, तरीही तो एलोपॅथी उपचार करत होता. त्याच्या दवाखान्यातून मोठ्या प्रमाणावर एलोपॅथी औषधे, इंजेक्शन्स आणि वैद्यकीय उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी पालिकेचे बिलालपाडा प्राथमिक नागरि आरोग्य केंद्राचे डॉ. शाहीन शेख यांच्या तक्रारीवरून तुळींज पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ति चौधरी यांनी सांगितले की, महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत ३१ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली असून ही मोहीम पुढेही सुरु राहणार आहे. नागरिकांनी केवळ नोंदणीकृत आणि अधिकृत डॉक्टरांकडूनच उपचार घ्यावेत, तसेच संशयास्पद वैद्यकीय कृतीची माहिती आरोग्य विभाग किंवा पोलिसांना तात्काळ द्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.