वसई– सुर्या प्रकल्पाच्या अतिरिक्त पाण्याला होणार्‍या विलंबामुळे वसई विरार शहराचे राजकारण पेटले आहे. मात्र मागील ४ महिन्यांपासून एमएमआरडीएने हे पाणी रोखून धरल्याचा आरोप महापालिकेने केला आहे. आमची तयारी झाली असून पाणी देण्यात यावे यासाठी पालिकेने एमएमआरडीएला मागील ५ महिन्यात ४ पत्रे दिल्याचे उघड झाले आहे.

वसई विरार शहराला सुर्या पाणी प्रकल्पातून एमएमआरडीएतर्फे अतिरिक्त १६५ दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे. सध्या शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांची आशा आता या पाण्यावर आहे. हे पाणी आल्यानंतर तहानलेल्या वसईकरांचे जलसंकट दूर होणार आहे. सुर्या प्रकल्पातून अतिरिक्त पाणी आणून ते वसई विरार शहराला देण्याची योजना होती. हे काम जुलै २०२३ मध्ये पूर्ण झाले होते. पाण्याची जलदाब चाचणी देखील जुलै महिन्यात पूर्ण झाली होती. पाण्याच्या वितरणासाठी पाणी प्रकल्पांपासून जलकुंभापर्यंत ९४.५२ किलोमीटरच्या जलवाहिन्या अथंरण्याचे काम पूर्ण झाले होते. त्यामुळे पालिकेने ४ जुलै रोजीच एमएमआरडीएला पहिले पत्र देऊन पाणी देण्याची मागणी केली होती. आमची सर्व तयारी पूर्ण झाली असून पाणी देण्यात यावे अशी मागणी या पत्रात करण्यात आली होती. यानंतर पालिकेने वेळोवेळी एमएमआरडीएला एकूण ४ पत्रे दिली आहेत. मागील आठवड्यात देखील पालिकेने एमएमआरडीएला पत्र लिहून त्वरीत पाणी सुरू करावे अशी मागणी केली. मात्र अद्याप तांत्रिक कारण देत एमएमआरडीएने पाणी दिलेले नाही.

हेही वाचा >>>पालघर मध्ये अमली पदार्थाचा कारखाना, ३७ कोटींची एमडी जप्त; मीरा भाईंदर वसई विरार गुन्हे शाखेची कारवाई

वास्तवित पालिकेप्रमाणे एमएमआरडीएची देखील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पाणी देण्यास कुठलाही अडचण नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले. परंतु उद्घटनाच्या श्रेयासाठी एमएमआरडीए मागील 4 महिन्यांपासून पाणी अडवून ठेवल्याचा आरोप पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला. नागरिकांचा रोष पालिकेवर असतो. परंतु वास्तविक एमएमआरडीएने पाणी अडवून ठेवले आहे, असा आरोप वसई विरार महापालिकेने केला आहे. आमच्याकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ज्या क्षणी एमएमआरडीए पाणी देईन त्याच क्षणी आम्ही वसई विरारच्या नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवू, असे उपायुक्त (पाणी पुरवठा) तानाजी नरळे यांनी सांगितले.

१८५ नव्हे तर १६५ दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार

वसई विरार शहराला १८५ दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार असल्याचे सांगितले जात असले तरी वसई विरार शहराला त्यातील १६५ दशलक्ष लिटर्स पाणी मिळेल आणि उर्वरित २० दशलक्ष लिटर्स पाणी ६९ गावांना दिले जाणार आहे. हे १६५ दशलक्ष लिटर्स पाणी देखील लगेच मिळणार नसून ज्या दिवशी पाणी येईल तेव्हा फक्त ८० दशलक्ष लिटर्स पाणी दिले जाईल. उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर टप्प्या टप्प्याने पुढील पाणी मिळणार असल्याचे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.