भाईंदर : – भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेला कंटेनर वाद थांबण्याऐवजी अधिक चिघळण्याची चिन्हं आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे नवीन कंटेनर मिरा भाईंदर शहरात दाखल झाले असून हा वाद पेटून उठण्याची शक्यता आहे.
मिरा भाईंदर शहरात रस्त्यांच्या कडेला व पदपथांवर शिवसेनेकडून कंटेनर उभारून पक्षाच्या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत अशा सुमारे १६ शाखा स्थापन करण्यात आल्या असून, या सर्वच शाखा अनधिकृत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे अन्य राजकीय पक्षांकडून या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, राजकीय दबावामुळे महापालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपनेही विरोध दर्शवण्यासाठी म्हणून शहरात कंटेनर कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, भाजपने महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्या निवासस्थानाबाहेरच कंटेनर कार्यालय उभारून त्याचे उद्घाटन केले.त्यावर प्रतिक्रिया देताना आयुक्तांनी अनधिकृत कार्यालयांची यादी तयार करून लवकरच कारवाई केली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, तीन दिवस उलटूनही प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न झाल्यामुळे प्रशासकीय भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, हा वाद थांबेल असे वाटत असतानाच गुरुवारी रात्री पुन्हा एकदा शिवसेनेचे नवीन कंटेनर शहरात दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मिरा रोड येथील प्रभाग क्रमांक २० मध्ये नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अश्विन कसोदरिया यांना हे कंटेनर देण्यात आले असल्याचे समजते. मात्र, याबाबत बोलण्यास कसोदरिया यांनी नकार दिला आहे.