मयुर ठाकूर लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाईंदरमधील घरकाम करणार्‍या महिलेचा मुलगा सुजीत सोनकांबळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डॉक्टर बनला आहे. नुकत्याच निकाल लागला असून त्याने  बंगळूर येथून फिजिओथेरेपीची पदवी मिळवली आहे. झोपडपट्टीत राहणार्‍या सुजीतने पालिका शाळेत आणि नंतर शिष्यवृत्तीच्या मदतीनने आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

काशिमीरा येथील डोंगरी झोपडपट्टीतुन पालिकेच्या संक्रमण शिबिरात सुजित सोनकांबळे हा तरुण राहतो. त्याची आई मंदा  सोनकांबळे या घरकाम करतात तर वडील किरकोळ कामे. तीन भाऊ आणि चार बहिणी अश्या आठ भावंडांच्या  मोठ्या  कुटूंबात सुजीत वाढला. लहानपणापासून सुजित अभ्यासात हुशार असल्यामुळे त्याला पुढील शिक्षण देण्याचा निर्धार त्याच्या आईने केला होता. वडील व मोठ्या बहिणींना मिळणाऱ्या तुटपुंज्या  पैश्यातून त्याचे बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

हेही वाचा >>> भाईंदर: लंपी आजाराचा मीरा भाईंदर मध्ये शिरकाव, ८ गाईना आजराची लागण, तर इतर गाईना बंद करण्याचे पालिकेचे आदेश

सुजीतला प्रथम एमबीबीएस डॉक्टर होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने नीटची परीक्षा देखील दिली.यात एक वर्षाच्या अपयशानंतर तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे एमबीबीएसचे शिक्षण त्याला घेता आले नव्हते. त्यामुळे शिष्यवृत्ती मिळवून त्याने बेंगलोर येथील वैद्यकीय विद्यालयात फिजिओथेरेपीच्या अभ्यासक्रमासाठी  प्रवेश मिळवला. पाच वर्षांपासून खडतर परिस्थितीचा सामना करत  अखेर त्याने चांगले गुण प्राप्त करून नुकतीच डॉक्टरची पदवी प्राप्त केली आहे. पुढील उच्च पदवी घेण्यासाठी अभ्यासास सुरुवात केली असून भविष्यात गरीब नागरिकांची सेवा करण्यासाठी झोपडपट्टी परिसरात दवाखाना उघडणार असल्याचे सुजीतने सांगितले. तर मुलाला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल त्याच्या आईने समाधान व्यक्त केले आहे. मी माझ्या कुटुंबियांच्या परिश्रम आणि प्रोत्साहनामुळे इतके शिक्षण घेऊ शकलो. त्यामुळे समाजातील गरीब नागरिकांची सेवा करून इतर मुलांना प्रोत्साहित करण्याचे काम करणार असल्याचे सुजीतने सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son of house maid became a doctor in mira bhayander zws
First published on: 18-01-2023 at 19:45 IST