वसई: पालघर जिल्ह्यातील लाळ-खुरकुत या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत वसई तालुक्यातही गोवंशीय जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत शहरात ४ हजार ७०० इतके लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाकडून देण्यात आली असून अजूनही ही लसीकरण सुरु आहे.
वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. विशेषतः शहराच्या ग्रामीण भागात शेती आणि दुग्ध व्यवसायामुळे या भागात गाई, म्हशी, बकऱ्या अशी जनावरे मोठ्या प्रमाणावर पालन केले जाते. विषाणूजन्य आजाराचा प्रदुर्भाव या गुरांना होऊन त्यांच्या आरोग्यावर आणि परिणामी त्यांच्या उत्पादन क्षमतेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असते. सध्या शहरात लाळ-खुरकुत या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना पालघर जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
वसई तालुक्यासाठी ३० हजार लसींचे वाटप करण्यात आले असून, त्यापैकी ४ हजार ७०० मात्रांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरु राहणार त्याआधी पशुपालकांनी आपल्या गुरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर यांनी केले आहे.
काय आहे लाळ-खुरकुत आजार?
लाळ-खुरकुत हा एक अत्यंत संसर्गजन्य आजार असून, तो प्रामुख्याने गायी, म्हशी आणि बकऱ्यांसारख्या जनावरांमध्ये आढळतो. या आजारात जनावरांना १०३ ते १०४ डिग्री ताप येतो. त्यांच्या खुरींमध्ये आणि जिभेवर वेदनादायक जखमा होतात, ज्यामुळे त्यांना खाताना त्रास होतो. परिणामी जनावर लंगडत चालते आणि त्याच्या तोंडातून सतत लाळ गळते. या आजारामुळे जनावरांची दूध उत्पादन क्षमता कमी होते आणि ती पुन्हा पूर्वपदावर येत नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.