वसई: वसई विरार शहरात भटक्या श्वानांची दहशत निर्माण झाली आहे. वसई नालासोपाऱ्यात तीन दिवसांत ४२ जणांना भटक्या श्वानांनी दंश केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

वसई विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव अधिकच वाढू लागला आहे. मुख्य रस्ते, गल्ली बोळात सैरावैरा फिरणारे भटके श्वान नागरिक व लहान मुले  यांच्यावर हल्ला चढवत असल्याच्या घटना समोर येत असतात.काही वेळा हे श्वान दुचाकी चालकांच्या मागे ही धावत जात असल्याने श्वानांच्या भीतीने अपघात होण्याच्या घटना घडत आहेत.या वाढत्या श्वानांच्या उपद्रवामुळे श्वान दंश होण्याच्या घटना ही वाढू लागल्या आहेत.

हेही वाचा >>> वसई : पालिकेचे पाणी पथक स्थापन, आमदारांनी खडसावताच पालिका सक्रिय

शनिवारी वसई पश्चिमेच्या पारनाका गौळवाडा परिसरात एका भटक्या श्वानाने २७ जणांना दंश केल्याची घटना घडली आहे. यात साडेतीन वर्षाचा चिमुकल्यासह ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहेत. या श्वान दंश झालेल्या नागरिकांना महापालिकेच्या सर डी एम पेटिट रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. या २७ जणांमधील १६ जणांचे श्वान चावल्याचे घाव अधिक गंभीर होते. या सर्व नागरिकांवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने दिली आहे.

तर सोमवारी नालासोपारा स्थानक परिसरात एका भटक्या श्वानाने १५ जणांना श्वान दंश केल्याची घटना आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. मागील तीन दिवसांत शहरात ४२ जणांचा भटक्या श्वानांनी चावा घेतला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी सुद्धा अर्नाळा ग्रामपंचायत हद्दीत पिसाळलेल्या श्वानाने एकाच दिवशी २८ जणांना दंश केल्याची घटना घडली होती. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.