विरार : सणांचे दिवस सुरू असल्याने मिठाईची मागणी वाढली आहे. या काळात खुल्या मिठाईच्या पदार्थात भेसळ होण्याची शक्यता असल्याने शासनाने खुल्या मिठाई विक्रेत्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, अशा प्रकारे मिठाई विक्री करताना त्यावर मिठाई तयार केल्याची आणि त्याची कालबाह्यता असल्याच्या दोनही दिनांक ठळकपणे छापण्यात यावे. मात्र वसई, विरारमधील मिठाई विक्रेते या आदेशाची पायमल्ली करत मिठाई विक्री करत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

वसई, विरार परिसरात खाद्य पदार्थात मोठय़ा प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. सध्या सणासुदीच्या दिवसात मिठाईमध्ये भेसळ केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे भारतीय खाद्य सुरक्षा तथा मानक प्राधिकरण भारत सरकार यांनी खुली मिठाई विकताना तयार उत्पादन आणि मुदतीचा कालावधी बंधनकारक केला आहे. भेसळयुक्त पदार्थ आणि अन्नातून होणारी विषबाधा रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. असे असतानाही वसई-विरार शहरातील मिठाई विक्रेते हा नियम पाळत नाहीत. यात स्थानिक अन्न व औषध प्रशासनाकडून या संर्दभात कोणताही कारवाई केली जात नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामुळे मिठाई विक्रेते सर्रास नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. काही मोठय़ा मिठाई विक्रेत्यांनी यातून पळवाटा शोधत मिठाईचा वापर २४ तासाच्या आत वापर करावा असा संदेश मिठाईच्या आवरणावर छापला जातो. पण मिठाई कधी बनवली आणि किती वेळेपर्यंत खाण्या योग्य आहे. याचा कोणताही उल्लेख करत नाहीत. यामुळे ग्राहकास दुकानात मिळणारी मिठाई दुकानदाराने कधी बनवली याचा कोणताही पत्ता लागत नाही. उत्पादन आणि वैधतेची कोणतीही माहिती मिळत नसल्याने मिठाई ताजी आहे की नाही  हे समजणे कठीण होते. आणि अशी मिठाई खाल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो. यामुळे त्यावर उत्पादनाची तारीख आणि वापराचा कालावधी नमूद करणे आवश्यक आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याने भेसळखोर सक्रिय झाले आहेत. तर दुसरीकडे मिठाई विक्रेते सदरच्या नियमाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगत आपली बाजू सांभाळत आहेत. पण यात सामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.