वसई:- शहर स्वच्छतेसाठी वसई विरार पालिकेने शुक्रवारी अखेर तिसऱ्यांदा निविदा जाहीर केली. नव्याने काढण्यात आलेली निविदा ९ प्रभागासाठी असून याचा कालावधी पाच वर्ष असणार आहे. यापूर्वी विविध कारणांमुळे दोन वेळा निविदा रद्द करण्यात आली होती. तर जुन्या निविदेला १३ वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
वसई – विरार शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कचऱ्याची समस्या देखील वाढलेली आहे. शहरात सध्या कचऱ्याची समस्या बिकट झाली असून जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. तसेच कचराभूमीवरील कचऱ्याचे ढीग देखील वाढत असून अनेकदा हा कचरा नाल्यांमध्ये वाहून जाताना दिसून येत आहे. या सर्वांवर उपाययोजना म्हणून पालिकेने कचऱ्याचे विविध प्रकल्प हाती घेत कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पालिकेने काढलेल्या दोन निविदा प्रक्रिया काही अडचणींमुळे रद्द करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा नव्याने नऊ प्रभागांसाठी ९ स्वतंत्र अशा निविदा काढल्या आहेत. याबाबतची सार्वजनिक नोटीस शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे.
अशी आहे नवीन निविदा
नव्याने काढण्यात आलेली निविदा ही ठोक पद्धतीची (लमसम ) स्वरूपाची असून यात दैनंदिन सफाई, रस्ते सफाई, घरोघरी जाऊन कचरा संकलीत करून त्या कचऱ्याची कचराभूमीपर्यंत वाहतूक करणे या कामांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यात कचरा वाहतूक करण्यासाठी जीआयएस मोबाईल कॉम्पॅक्टर वाहनांचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे असे घनकचरा व्यवस्थापनाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले आहे. यापूर्वी महिन्याला कचरा वाहतूक करण्यासाठी सरासरी १७ ते १८ कोटी खर्च होत होता त्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे.
जीपीएस यंत्राद्वारे स्वच्छतेवर लक्ष
दैनंदिन शहर स्वच्छता करण्यासाठी नियुक्त केलेले काही सफाई कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. महापालिका क्षेत्रातील सफाई कामगारांना स्मार्ट घड्याळ देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून त्यातील जीपीएस प्रणालीद्वारे कर्मचारी त्याच्या नेमुन दिलेल्या ठिकाणी काम करतो आहे की नाही, याची माहीती प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. सफाई कामगारांना शिस्त लागावी तसेच काम करताना एखादी दुर्घटना घडल्यास त्याची तात्काळ माहिती मिळावी या उद्देशातून पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी १३ वेळा मुदत वाढ
घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत काढण्यात येत असलेल्या निविदांमध्ये वारंवार निर्माण होणारे गोंधळ यामुळे सातत्याने मुदत वाढ द्यावी लागत होती. २०२१ ते २०२५ या कालावधी निविदांप्रक्रियांच्या गोंधळात १३ वेळा मुदत वाढ देण्यात आली होती.
गटार स्वच्छतेसाठी स्वतंत्र निविदा
यापूर्वी घनकचरा विल्हेवाटीच्या निविदेमध्ये गटार व चेंबर सफाईची कामे समाविष्ट केली होती. आता नव्याने काढलेल्या निवेदेतून गटार स्वच्छतेला वगळण्यात आले असून यासाठी स्वतंत्र अशी निविदा काढली जाणार आहे. यात संपूर्ण गटारांची स्वच्छता ही यांत्रिक पध्दतीने करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
शहरातील स्वच्छता चांगल्याप्रकारे व्हावी असा पालिकेचा प्रयत्न आहे. यासाठी नव्याने निविदा काढली आहे. यामुळे घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने होण्यास मदत होणार आहे. तसेच सफाई कामगारांना जीपीएस घड्याळे देण्यात येणार असून यामुळे कामात शिस्त राहणार आहे. –मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त, वसई विरार महानगरपालिका