भाईंदर : ‘नो पार्किंग’ क्षेत्रात उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात लवकरच १७ नवीन टोईंग वाहने दाखल होणार आहेत. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक कठोरपणे कारवाई करता येणार असून, शहरातील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिरा भाईंदर आणि वसई-विरार शहरांमध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. परिणामी, रस्त्यांवर ताण निर्माण होत असून अरुंद रस्त्यांवर वाहन उभी करण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत ‘नो पार्किंग’ क्षेत्र निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी वाहन उभी केल्यास ती टोईंग करून पोलिसांच्या गोदामात नेली जातात आणि संबंधित वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली जाते.
मात्र, मागील काही महिन्यांपासून या कारवाईचा वेग मंदावल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे या प्रक्रियेला गती देण्यासाठी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या सूचनेनुसार टोईंग वाहनांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने १७ अतिरिक्त टोईंग वाहनांचा प्रस्ताव वाहतूक विभागाने तयार केला होता, त्याला आता अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. ही वाहने लवकरच प्रत्यक्ष रस्त्यांवर कारवाई करताना दिसणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली आहे.
कामाचे कंत्राट
मिरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत ‘नो पार्किंग’ क्षेत्रात उभी असलेली वाहने टोईंग करून पोलिस गोदामात नेली जातात. यावेळी संबंधित वाहनचालकाकडून वाहतूक दंडासोबतच २०० रुपयांचे टोईंग शुल्कही आकारले जाते. नव्या टोईंग वाहनांची संख्या वाढवण्यासाठी आयुक्तालयाने निविदा प्रक्रिया सुरू केली होती. सध्या कंत्राटदार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ती पूर्ण होईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली आहे.