भाईंदर – मागील तीन वर्षांपासून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दहिसर टोल नाका ते दिल्लीदरबार या मार्गाचे काँक्रिटीकरण रखडले आहे. परिणामी, या मार्गाची अवस्था दयनीय झाली असून, टोल नाक्यावर वाहतूक कोंडीचा त्रास वाढला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर टोल नाक्यापासून ते पालघरपर्यंत एकूण १२१ किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहे. मागील चार वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाचे सध्या ९७ टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे. मात्र, दहिसर टोल नाक्याजवळील सुमारे दीड किलोमीटरचा पट्टा मागील तीन वर्षांपासून रखडलेला आहे. या रखडलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, वाहनचालकांना या खड्ड्यांमधून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होतो आणि दहिसर टोल नाक्यापासून लांबपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण होते. अनेक वेळा प्रवाशांना या कोंडीत अर्धा तास वाया घालावा लागतो. त्यामुळे रस्त्यांची निकृष्ट अवस्था आणि उपाययोजनांचा अभाव यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.
नियोजन करणे कठीण
दहिसर टोल नाक्याजवळ एका बाजूला मेट्रोचे काम सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यामुळे अशा परिस्थितीत त्या ठिकाणी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम नियोजित करणे अत्यंत कठीण झाले आहे. यापूर्वीही वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडू नये म्हणून वाहतूक पोलिसांनी कामासाठी परवानगी दिली नव्हती.परिणामी, तोच पट्टा रखडला असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक अधिकारी सुहास चिटणीस यांनी दिली.
खड्डे बुजवण्याचे काम सुरू
पावसाच्या आगमनानंतर काही ठिकाणी डांबरी रस्त्यावर खड्डे पडण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अशा खड्ड्यांचे भरावकाम सुरू असल्याचे चिटणीस यांनी सांगितले. विशेषतः दहिसर टोल नाक्याजवळील खड्डे तातडीने भरले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.