वसई :- अलीकडच्या काळात स्थानिक समस्यांवर भाष्य करण्यासाठी सामान्य नागरिकांना मिळालेलं एक साधन म्हणजे समाजमाध्यमं. पाणी टंचाई, अनियमित वीजपुरवठा, वाहतूककोंडी, खराब रस्ते अशा विविध समस्यांवर भाष्य करणाऱ्या चित्रफिती समाजमाध्यमांवर फिरत असतात. तर नालासोपाऱ्यातील गर्दी, वाहतूक कोंडी, फेरीवाल्याचं अतिक्रमण आणि वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणारे वाहनचालक या सर्वच समस्यांवर भटकंती या कार्यक्रमातील अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या शैलीत टीका करणाऱ्या एका तरुणाची चित्रफीत सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

एकेकाळी शूर्पारक नगरी किंवा सोपारा या नावाने प्रसिद्ध असणारे आणि वसई विरारमध्ये वसलेले शहर म्हणजे नालासोपारा सुरवातीला निसर्ग संपन्न अशी नालासोपारा शहराची ओळख होती. मात्र मागील काही वर्षांपासून नालासोपारा शहराचे रुपडे पालटले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली अनधिकृत बांधकामे झाली आहेत. अगदी परवडणाऱ्या दरात या ठिकाणी चाळीत व लोड बेअरिंग इमारतीत मोठ्या संख्येने परप्रांतीय बांधव स्थलांतरित होऊन या ठिकाणी वास्तव्यास आले आहेत. दिवसेंदिवस येथील लोकसंख्या वाढत असल्याचे विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.

समाजमाध्यमांचा माध्यमातून नालासोपाऱ्यातील समस्यांवरनेहमीच टीका होत असते. अशीच एक चित्रफीत आताही व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या चित्रफितीत तरुण नालासोपाऱ्यातील परिस्थितीचे अत्यंत रोखठोक आणि मिश्किल वर्णन करताना दिसत आहे. शहरातील गर्दीबद्दल बोलताना तरुण व्हिडिओमध्ये म्हणतो, “तुम्हाला जर नालासोपाऱ्यातून सकाळची ८ वाजताची लोकल पकडायची असेल, तर किमान ७ वाजताच घरातून निघावे लागेल. नाहीतर शहरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे तुम्हाला उशीर होऊ शकतो. याशिवाय, त्याने वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या आणि सिग्नलकडे दुर्लक्ष करणाऱ्या बेदरकार वाहनचालकांनाही व्हिडिओतून फटकारले आहे. त्याच्या या रीलवर नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया देत त्याने मांडलेल्या समस्यांचे समर्थन केले आहे.

फेरीवाल्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ

या रिलमध्ये तरुणाने रस्त्याच्या कडेला, चौकात ठिकठिकाणी वाढत जाणारे फेरीवाल्यांचे अतिक्रमण हे वाहतूक कोंडीचे मुख्य कारण असल्याचे म्हटले आहे. पण इथल्या लोकांना याचा काहीच त्रास होत नाही, ते यासाठी महानगरपालिकेला किंवा प्रशासनाला प्रश्नही विचारत नाहीत आणि शहरातील वाहतूक कोंडी वाईट असली तरी इथले लोक खूप चांगले आहेत. बाहेरून आलेल्या प्रत्येकाला ते आपल्यात सामावून घेतात, असा टोला त्याने स्थानिक नागरिकांना लगावला आहे.