भाईंदर : मिरा रोड येथील घोडबंदर गावाबाहेर रस्ता अडवून उभ्या राहणाऱ्या डंपरवर अखेर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. यात एकाच दिवशी तब्बल ३० वाहनांवर कारवाई करून सुमारे १६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
मिरा-भाईंदर शहराच्या टोकाला असलेले घोडबंदर हे ऐतिहासिक गाव आहे. त्यामुळे येथे आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याकडे महापालिकेचे विशेष लक्ष असते. मात्र, गेल्या काही वर्षांतील वाढत्या शहरीकरणाचा मोठा फटका या गावाला बसू लागला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण व नव्या इमारतीच्या बांधकामामुळे गावाजवळ सिमेंट काँक्रीटच्या प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यामुळे या सिमेंट ची वाहतूक करण्यासाठी तसेच जवळील उल्हास नदीतून उपसा केलेल्या वाळूची वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डंपर चा वापर या ठिकाणी होत आहे.
मात्र गावातील रस्ते अरुंद असल्यामुळे या डंपरमुळे स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.. त्यात डंपर चालक वाहतूक करून आल्यानंतर गावाला लागून असलेल्या रस्त्याच्या कडेला ही वाहने उभी करत आहेत.परिणामी रस्ता अडवला जात असून वाहतूक कोंडीची समस्या उभी राहत आहे. त्यामुळे याबाबत गावकऱ्यांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत.
अखेर बुधवारी वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे यामध्ये तब्बल ३० डंपरवर दंडात्मक कारवाई करून १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच चालकांना तातडीने वाहने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, यापुढे अशा प्रकारचा प्रकार घडल्यास दुपटीने कारवाई केली जाईल, असा इशारा काशिमिरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी दिला.