वसई : शालेय बसेस व व्हॅन मधून विद्यार्थ्यांची धोकादायक रित्या वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. या तक्रारीनंतर प्रादेशिक परिवहन विभागाने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस व अन्य वाहनांची तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत ४३६ वाहनांची तपासणी केली त्यात दोषी आढळून आलेल्या ८५ बसेसवर कारवाई केली आहे.
शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्यासाठी बस गाड्या, व्हॅन ही ठेवल्या जात आहेत. परंतु या मुलांची सुरक्षित रित्या वाहतूक होणे आवश्यक आहे. काही ठिकाणी शाळेला लावण्यात आलेल्या बसेस नियमांचे व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या सूचनांचे पालन करीत नाहीत. काही ठिकाणी कोंबून कोंबून मुलांना व्हॅन मध्ये बसविले जाते. यामुळे अपघातासारख्या घटना समोर येत असतात.
या धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची होणारी वाहतूक याबाबत परिवहन विभागाकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारी नंतर प्रादेशिक परिवहन विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस व अन्य वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या बसेस व इतर गाड्या यांचे वैध विमा प्रमाणपत्र, वैध वाहन योग्यता प्रमाणपत्र, चालक- मदतनीस, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचे मार्ग, अग्निसुरक्षा यंत्रणा अशा सर्व बाबी तपासून घेतल्या जात असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले आहे.
या तपासणीसाठी वायू वेग पथके सक्रिय करण्यात आली आहेत. यात शहरातील ४३६ बसेसची तपासणी केली असून त्यात ८५ बसेस दोषी आढळून आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करीत १४ लाख २८ हजार इतका दंड वसूल केला आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ६६ अन्वये भाडेतत्वावर व्यवसाय करणाऱ्या वाहनाकडे विधीग्राह्य परवाना (permit) असणे आवश्यक आहे. या विशेष मोहिमेदरम्यान परवाना नसलेल्या खाजगी वाहनांतून विद्यार्थी वाहतूक होणाऱ्या एकूण ५८ वाहनांवर कारवाई केली असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.
शालेय बसेस ची तपासणी मोहीम सुरू केली आहे. शालेय व्यवस्थापनाने सुद्धा शालेय परिवहन समितीच्या नियमित बैठकांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितपणे होत असल्याचे सुनिश्चित करावे. अतुल आदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई.