भाईंदर :-मिरा भाईंदरमधील आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीची बैठक मिरा भाईंदर महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीत शहरातील आदिवासी नागरिक अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र समोर आले.
मिरा भाईंदर शहरात एकूण २८ आदिवासी पाडे असून, येथे सुमारे सात हजार आदिवासी नागरिक राहत आहेत. हे पाडे शहराच्या आतील भागात वसलेले असल्यामुळे येथील नागरिक मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यांची परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि उपाययोजना आखण्यासाठी ही बैठक मंगळवारी घेण्यात आली होती.या बैठकीस आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा, अप्पर तहसीलदार निलेश गौंड तसेच विविध विभागांचे अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी आदिवासी पाड्यातील नागरिकांना शिक्षण, स्वच्छ पाणी, हक्काचे घर, जातीचे दाखले, रस्ते, वीज, स्मशानभूमी, साफसफाई, आरोग्य केंद्र आणि शैक्षणिक सुविधा यांचा अभाव असल्याचे समोर आले.
या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी प्रशासनाला दिल्या.
सुविधा देत असल्याचा महापालिकेचा दावा :
महापालिकेने या संदर्भात सांगितले की, आदिवासी पाड्यांमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर आहे.यात पाड्यांमध्ये पथदिवे, रस्ते, मोफत टँकरद्वारे पाणी, फिरता दवाखाना यांसारख्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.याशिवाय, महापालिकेच्या एकूण अर्थसंकल्पातील ५ टक्के निधी फक्त आदिवासी विकासासाठी खर्च केला जात असल्याचा दावाही या बैठकीत करण्यात आला आहे.