वसई: नव्याने बांधण्यात आलेल्या वर्सोवा पुलावर अवघ्या ३ महिन्यांतच खड्डे पडल्याचे समजताच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी संतप्त झाले. त्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यां जाब विचारत संबंधित ठेकेदाराला काळय़ा यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत.मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा (वरसावे) खाडीवरील पुलाशेजारी नवीन पूल बांधण्यात आला आहे.
मात्र अवघ्या तीन महिन्यातच नव्या वर्सोवा पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून ६८ ठिकाणी पुलावरील सळया बाहेर आल्या आहेत. या खड्डयांबाबत पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन माहिती दिली. नव्या पुलावरील खड्डे आणि निकृष्ट काम पाहून गडकरी संतापले. त्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फोन करून अवघ्या तीन महिन्यात खड्डे पडलेच कसे याचा जाब विचारला. याप्रकरणी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळया यादीत टाका आणि पुढची कामे देऊ नका, असे आदेश त्यांनी दिले.