भाईंदर : अवकाळी पाऊस आणि मासेमारीवरील मर्यादा यामुळे अखेरचा हंगाम मच्छीमारांसाठी नुकसानदायक ठरू लागला आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी मच्छीमारांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना खोल पाण्यात जाण्यास शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे उत्तनचे मच्छीमार किनाऱ्यावरच थांबले आहेत. येत्या ३१ मेनंतर दोन महिन्यांसाठी मासेमारीवर बंदी असणार आहे. त्यामुळे अखेरच्या हंगामात मासळी गोळा करून आर्थिक साठा करण्याचा प्रयत्न मच्छीमार करत होते.
विशेषतः मागील चार महिन्यांपासून जाळ्यात न लागणारी मासळी अलीकडील काही दिवसांपासून लागण्यास सुरुवात झाल्यामुळे मच्छीमारांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र नाईलाजाने किनाऱ्यावरच थांबावे लागत असल्यामुळे मच्छीमारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
प्रामुख्याने एक बोट समुद्रात जात असताना किमान चार ते पाच खलाशी, हजारो लिटर डिझेल आणि इतर साधनसामग्री लागते. यासाठी बोट मालकाला मोठी रक्कम खर्च करावी लागते. मात्र बोट किनाऱ्यावरच उभी राहिल्यास खलाशांचा पगार व इतर खर्च अंगावर येतो. त्यात मासळी जाळ्यात न लागल्यास उत्पन्न थांबते. परिणामी, अनेक मच्छीमार आता खासगी संस्था किंवा पतपेढ्यांकडून कर्ज घेऊन हा खर्च भागवत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले आहे.
पंचनामा करण्याची मागणी
उत्तनचे मच्छीमार ओल्या मासळीसह सुक्या मासळी विकून आर्थिक उत्पन्न मिळवतात. सुक्या मासळीत प्रामुख्याने जवळा, करदी, बांगडा, बोंबील आणि वाकटी या मासळींचा समावेश असतो. मात्र मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे उन्हात सुकत घातलेल्या मासळीचे मोठे नुकसान होत आहे. नुकतेच शासनाने मासेमारीला शेतीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे सुक्या मासळीच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून मच्छीमारांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात आली आहे.