भाईंदर : अवकाळी पावसामुळे यंदा उत्तनच्या प्रसिद्ध हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. या आंब्याचे केवळ २० टक्केच उत्पन्न आले असून, मोठय़ा व्यापाऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याने हा आंबा घाऊक बाजारात विकता आलेला नाही, अशी खंत येथील बागायतदारांनी व्यक्त केली आहे. परिणामी, आंबाप्रेमींना या हापूसची चव चाखता आलेली नाही.
भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात अनेक वर्षांपासून बागायतदार आंब्याचे उत्पन्न घेत आहेत. कोकण किनारपट्टीवरील या आंब्याला ‘उत्तनचा राजा’ अशी ओळख आहे. हा आंबा उशिरा म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस येत असल्यामुळे या आंब्याला विशेष मागणी असते. मात्र यंदा साधारण मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे या आंब्याचे अधिक नुकसान झाले आहे. परिणामी, उत्तन परिसरातील बागांमधून केवळ १५ ते २० टक्केच आंब्याचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे या बागायतदारांचा आंब्याच्या पिकासाठी केलेला खर्चही निघालेला नाही. त्यात हा आंबाच उशिरा येत असल्यामुळे शिल्लक राहिलेल्या आंब्याकडे मोठय़ा व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने तो बाजारात दाखल झालेला नाही.
भरपाईची मागणी
उत्तन परिसरात आंब्याचे अनेक बागायतदार आहेत. तसेच या भागांत अनेक पर्यटनस्थळे असल्यामुळे स्थानिक नागरिकही आंब्याची विक्री करून उदरनिर्वाह करतात, परंतु यंदा अवकाळी पावसामुळे आंब्याचे उत्पन्न घटल्याने बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्याच्या पिकासाठी केलेला खर्चही भरून निघत नसल्यामुळे पुढील वर्षी उत्पन्न घेणे कठीण होणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी तहसीलदारांकडे बागायतदारांनी केली आहे.
यंदा आंब्याचे उत्पन्न अतिशय अल्प प्रमाणात मिळाले आहे. त्यात हा आंबा खरेदी करण्याकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे नाइलाजाने हा आंबा स्थानिक लोकांनाच खायला मिळणार आहे.
– प्रशांत शाह, बागायतदार