वसई- वसई वाहतूक पोलिसांनी बेकायदेशीर रिक्षाचालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. रविवारी वसई रोड परिसरात केलेल्या कारवाईत १५ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

वसई विरार शहराच्या वाढत्या लोकसंख्ये सोबत रिक्षांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. विशेषतः परवाने खुले झाल्या नंतर अधिक प्रमाणात रिक्षा शहरातील रस्त्यावर धावत आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी अनधिकृत रिक्षा, कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसलेल्या रिक्षा सर्रास पणे चालविल्या जात आहेत. शहरातील बेकायदेशीर रिक्षाचालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई पुन्हा सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती. रविवारी रात्री वसई रोड परिसरात केलेल्या कारवाईत १५ रिक्षा जप्त करण्यात आल्याची माहिती वसई वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांघी यांनी दिली.

रात्रीच्या वेळी सर्वाधिक बेकायेदशीर रिक्षा

सर्वाधिक बेकायदेशीर रिक्षा या रात्रीच्या वेळी रस्त्यावर धावत असल्याची माहिती पोलिासंनी दिली. कोणत्याही प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागू नये यासाठी हे रिक्षाचालक रात्रीच रिक्षा घेऊन बाहेर पडत असता. यातील बहुतांश रिक्षाचालक हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेकायदेशीर रिक्षांमध्ये वाढ

सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने खासगी प्रवासी वाहतूक करण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून ऑटोरिक्षांना मोटार वाहन कायद्यानुसार परवाने दिले जातात. २०१७ पासून ऑटोरिक्षा परवाने खुले करण्यात आले आहेत. परवाने खुले होताच शहरात रिक्षांना अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. परिवहन विभागाच्या दप्तरी सद्यस्थितीत ३४ हजार ५८२ रिक्षा धारकांना परवाने वितरण करण्यात आले आहेत. सुरवातीला शहरात केवळ ७ ते ८ हजार रिक्षा होत्या. आता रिक्षांची संख्या ही ३९ हजार ५७६ इतकी झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रिक्षांचा परिणाम हा शहरात दिसू लागला आहे. त्यातच काही अनधिकृत रिक्षांची भर पडत आहे. वसई, नायगाव, नालासोपारा, विरार अशा ठिकाणी स्थानकासह इतर परिसरात रिक्षांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. त्यातच काही रिक्षाचालक हे बेशिस्त पणे रिक्षा चालवित आहेत. रिक्षा रस्त्याच्या मध्येच अस्ताव्यस्त पध्दती उभ्या करतात. तर काहीवेळा प्रवासी घेण्याच्या नादात मध्येच रिक्षा थांबविल्या जातात यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी, हॉर्नचा त्रास यामुळे वाढती रिक्षांची संख्या ही शहराची डोकेदुखी ठरू लागली आहे. काही वेळा रिक्षा या थांबा सोडून मध्येच उभ्या करतात अशा वेळी रुग्णवाहिका बाहेर पडण्यास अडचणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.