वसई – वाहतुकांच्या नियमांचे उल्लंघन केलं तर वाहतूक पोलीस नाही तर चक्क एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) तुम्हाला दंड करणार आहे. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने हे खास एआय तंत्रज्ञानावर आणले आहे. शुक्रवारी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात त्याचा शुभांरभ करण्यात आला.

शहरात जागोजागी लावलेल्या कॅमेर्‍यातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना एआय तंत्रत्रानाने हुडकून काढून थेट दंडाचे चलान पाठवले जाणार आहे. ही यंत्रणा पुर्णपणे स्वयंचलीत, बिनचूक आणि वेगवान असणार आहे.

वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघ होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते. वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण व्हायची. ते रोखण्यााठी शहरात कॅमेरे बसविण्यात आले होते. परंतु नियंत्रण कक्षात या कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवणे, चालकांचे वाहन क्रमांक शोधणे त्यांना दंडाचे चलान पाठवणे या गोष्टी पोलिसांना कराव्या लागत होत्या. त्यात वेळ खर्च व्हायचा. मनुष्यबळ त्यात अडकून पडायचे. त्यावर उपाय म्हणून मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्मार्ट ट्रॅफिकिंग हा उफक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरात जागोजागी कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे नियत्रंण कक्षात एआय तंत्रज्ञानाशी जोडण्यात आले आहेत. कुणी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर तात्काळ एआय त्याची नोंद घेईल आणि त्याच्या क्रमांकावरून शोधून दंडाचे चलान थेट मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. कॅमेर्‍यातून छायाचित्रे काढून पुरावा देखील संबंधित वाहनचालकाला देण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील एकमेव उपक्रम असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे, अपघात रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात विनाहेल्मेट आणि दुचाकीवर तीन जणं असल्यास (ट्रीपल सीट) कारवाई केली जाणार आहे. पुढील टप्प्यात एकदिशा मार्गातून प्रवेश, चुकीच्या मार्गिकेतून वाहन चालवणे, मर्यादीत वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. सध्या शहरात दोनशे कॅमेरे आहेत. ३ हजार कॅमेरे लावण्यासाठी निधी मिळावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे अशी माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली. मार्च महिन्यात प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यानंतर त्याची शुक्रवारपासून अमंलबजाणी सुरू करण्यात आली आहे.

अपघात, गुन्ह्यांचा माग काढणे सोप्पे

या उपक्रमाअंतर्गत पोलिसांनी धावत्या वाहनांचे स्वयंचलित क्रमांक टिपणारे (एएनपीआर) कॅमेरे बसविले आहेत. वाहन कितीही वेगात असले तरी त्याचा क्रमांक या कॅमेर्‍यातून टिपला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघात करून पळून जाणार्‍या वाहनांना शोधणे सोप्पे होणार आहे. जे गुन्हेगारा गुन्हा करून जात असतील त्यांचाही माग या कॅमेर्‍याद्वारे काढता येणार आहे. हे एएनपीआर कॅमेरे देखील एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) ला जोडले असल्याने तात्काळ अशा वाहनांची माहिती मिळू शकणार आहे.