वसई: मिरा भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वाद पेटलेला असतानाच विरार मध्ये एका रिक्षाचालकाने दुचाकीस्वार तरुणाला मराठीत बोलल्यावरून धमकावले असून “मी हिंदी किंवा भोजपुरीमध्येच बोलणार, मराठी चालणार नाही” असे म्हणत त्याने दमदाटी केली होती. याच मुजोर रिक्षाचालकाला आता शिवसेना (ठाकरे) कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे. त्याची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे.
८ जुलै रोजी दुचाकीस्वार भावेश आपल्या बहिणीसोबत रेल्वे स्टेशनकडे जात असताना, मागून आलेला एक रिक्षाचालक वेगाने दुचाकीस्वार भावेश आपल्या बहिणीसोबत रेल्वे स्टेशनकडे जात असताना, मागून आलेल्या एका रिक्षाचालकाने त्यांना कट मारला. त्यावेळी भावेशने रिक्षाचालकाला बाजूला थांबवले. भावेशने त्याला मराठीत, “तुला गाडी नीट चालवता येत नाही का?” असे विचारले. हे ऐकताच रिक्षाचालक संतापला आणि त्याने मराठीत बोलण्यास नकार देत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
रिक्षाचालकाने भावेशला, “मला मराठी समजत नाही, तुला हिंदीतच बोलावे लागेल. मी हिंदी आणि भोजपुरीमध्येच बोलणार,” असा आग्रह धरत दमदाटी केली होती. याची चित्रफीत ही समाज माध्यमावर प्रसारित झाली होती. त्यानंतर मराठी विषयी द्वेष दाखवणाऱ्या रिक्षा चालकाचा शोध घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला आहे.
यापुढे मराठी विषयी अपशब्द व अरेरावी करणार नाही असे सांगत रिक्षाचालकाने माफी मागितली आहे. या घटनेची चित्रफीत ही समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. महाराष्ट्रात येऊन मराठी भाषेचा द्वेष व अपमान करणाऱ्यांना अशाच प्रकारे धडा शिकविला जाईल असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे.