वसई : नायगाव पश्चिमेच्या बीच कॉम्प्लेक्स मध्ये बॅडमिंटनचा अडकलेला शटल कॉक काढण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. आकाश संतोष साहू असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
नायगाव पश्चिमेच्या परीसरात बीच कॉम्प्लेक्स सोसायटी आहे. या सोसायटीच्या आवारात शुक्रवारी सायंकाळी आकाश साहू व त्याचे तीन चार मित्र बॅडमिंटन खेळत होते बॅडमिंटन खेळताना त्याचा शटल कॉक हा पहिल्या माळ्यावरील सज्जावर अडकला होता. तो काढण्यासाठी आकाश वर चढला मात्र त्या ठिकाणी असलेल्या एसीच्या विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून खाली कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे.
आकाश हा सेंट झेविअर हायस्कुलमध्ये इयत्ता दहावीत शिकत होता. या घडलेल्या घटनेमुळे कॉलनी परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पहिल्या माळावर राहत असलेल्या गृहस्थांनी त्यांची एसी सुरूच ठेवली होती. याशिवाय त्यातून विद्युत प्रवाह बाहेर येत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले. या निष्काळजीपणामुळे या मुलाला विजेचा धक्का लागला असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या घटनेची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.