वसई:- रस्ते अपघातात ‘मेंदूमृत’ (Brain Dead) झालेल्या वसईतील दिवाणमान येथील सत्यम संतोष दुबे (२४) या तरुणाचे अवयवदान करून त्याच्या कुटुंबियांनी मानवतेचा महान आदर्श घालून दिला आहे. कुटुंबियांच्या या धाडसी निर्णयामुळे गरजू रुग्णांना मूत्रपिंड, यकृत आणि दोन डोळे दान करता आले, यामुळे पाच लोकांना नवजीवन मिळाले आहे.

सत्यम हा वसई पश्चिमेच्या दिवाणमान येथे राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याचा मोटारसायकल अपघात झाला होता. यात त्याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. वसईतील श्रीसाई रुग्णालयात सत्यमवर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान तो ‘मेंदूमृत’ झाल्याचे वैद्यकीय पथकाने घोषित केले होते. सत्यम हा सर्वांना कायम मदत करणारा मुलगा असल्याने त्याच्यामुळे गरजू रुग्णांना नवजीवन मिळेल या उद्दात विचाराने त्याच्या आई वडिलांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी तातडीने ‘दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’चे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही यासाठी पुढाकार घेत २३ ऑक्टोबरला अवयवदानासाठी सत्यमला नालासोपारा येथील रिद्धी विनायक रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले. तेथे त्यांचे दोन डोळे, दोन मूत्रपिंड, यकृत याची अवयव दान प्रक्रिया पार पडली असल्याचे पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले आहे.

‘ग्रीन कॉरिडॉर’ची ऐतिहासिक यशस्वी अंमलबजावणी

या अवयव दानाचे वैशिष्ट्य म्हणजे, अवयव वेळेत गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी नालासोपारा सारख्या प्रचंड रहदारीच्या शहरातून मुंबईकडे प्रथमच ‘ग्रीन कॉरिडॉर’ची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या सुयोग्य समन्वयामुळे हे शक्य झाले. यशस्वी अवयवदानासाठी अनेक व्यक्ती व संस्थांचा सुयोग्य समन्वय आवश्यक होता. या प्रक्रियेत डॉ. वेंकट गोयल, डॉ. प्रणय ओझा, डॉ. सत्यप्रकाश यादव, डॉ. विठ्ठल निकम, झेडटीसीसीच्या उर्मिला महाजन तसेच नालासोपारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल वळवी व त्यांच्या पथकाने नियोजित वेळेत ही प्रक्रिया पार पाडली. रिद्धी विनायक रुग्णालयामधील हे दुसरे यशस्वी अवयव दान ठरले असून, वसईच्या सत्यम दुबेच्या रूपाने पाच गरजू रुग्णांना जगण्याची नवी आशा मिळाली आहे. ‘मरावे परी अवयव रूपी उरावे’ या उक्तीला सत्यमच्या कुटुंबियांनी आपल्या कृतीतून सार्थ ठरवले असल्याचे अवयव दान चळवळीचे पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले सांगितले.