वसई: तरुणांच्या वाढदिवस पार्टीत (मेजवानी) क्षुल्लक वादावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर गंभीर मारामारीत झाले. या वेळी झालेल्या हल्ल्यात ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. वसई पश्चिमेच्या पापडी येथील औद्योगिक वसाहत परिसरात रविवारी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली.
वसई पश्चिमेच्या पापडी येथे औद्योगिक वसाहत आहे. येथील औद्योगिक कंपनीत काम कऱणार्या एका तरुणाचा रविवारी वाढदिवस होता. आपल्या अन्य सहकारी मित्रांसमवेत तो रविवारी संध्याकाळी येथील एका मोकळ्या जागेत मेजवानी (पार्टी) साठी बसला होता. या मेजवानीत सगळे जण मद्यपान करत होते. रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्यात क्षुल्लक वादातून बाचाबाची सुरू झाली. त्या वादाने काही वेळातच उग्र रुप धारण केले.
यावेळी मनोज पांडे (३७) याने आपल्याकडील चाकू काढला आणि आकाश पवार (३०) आणि राहुल भुरकुंड (२७) यांच्यावर सपासप वार केले. जखमी अवस्थेत त्यांनी देखील आरोपी मनोज पांडे याच्यावर वार केले. या हल्ल्यात आकाश पवार हा गंभीर जखमी झाला होता. जखमींना उपचारासाठी बंगली येथील कार्डिनल ग्रेशिअस रुग्णालयात दाखल करण्यात आले. आकाशच्या पोटाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी मनोज पांडे आणि राहुल भुरकुंड यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.
वाढदिवस पार्टीतील वादातून हा हल्ल्याचा प्रकार घडला आहे. आम्ही हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त केला आहे. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सद्यस्थितीत आरोपीवर उपचार सुरू असल्याने रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाईल, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी दिली.