Vasai Pakistan drug Smuggling case : वसई: देशभर पसरलेल्या अमली पदार्थांचे जाळे आता थेट पाकिस्तानपर्यंत पोहोचले आहे. राजस्थान सीमेलगत असलेल्या पाकिस्तानच्या एका छोट्या गावातून भारतात तस्करी करून अमली पदार्थ आणले जात असल्याचे गुन्हे शाखा ३ च्या पथकाने उघडकीस आणले आहे. गुन्हे शाखेने नुकतीच कारवाई करून ८ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते. त्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वसई विरार व मीरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होऊ लागली आहे. अशा अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवायांच्या मोहिमा सुरू केल्या आहेत.११ सप्टेंबर रोजी विरार गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने फादरवाडी रेंजनाका रस्त्यावरील श्रीपाल टॉवर येथे सापळा रचून कारवाई करत समुंदरसिंग देवडा (४९), युवराजसिंग राठोड (२८), तकतसिंग राजपूत (३८) या तीन आरोपींना अटक केली होती.
आरोपींकडून ८ कोटी ४ लाख ४० हजार किंमतीचा २ किलो ११ ग्रॅम वजनाचा हेरॉईन नावाचा अमली पदार्थ जप्त करून त्यांच्यावर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील अमली तस्करीतील मुख्य सूत्रधाराला राजस्थान मधील सिरोही येथून अटक केली आहे. हरिसिंह तेजसिंह रावलोटी भाटी (५५) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपींच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पाकिस्तान मधून अमली पदार्थांची तस्करी
अटक करण्यात आलेला हरिसिंह हा आरोपी हा भारत पाकिस्तान सीमेलगत असलेल्या सतू या गावात राहतो. या अमली पदार्थांचा पुरवठा पाकिस्तानातून होत असल्याची कबुली त्याने पोलिसांना तपासा दरम्यान दिली आहे. हा आरोपी पाकिस्तान मधील अमली पदार्थ पुरवठादारांच्या संपर्कात असून जेसेलमेर सीमेजवळून हा तस्करी करीत होता असे विरार गुन्हे शाखा कक्ष ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे यांनी सांगितले आहे. जप्त केलेल्या हेरॉईन अमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ८ कोटीहून अधिक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही कारवाई विरारच्या गुन्हे शाखा कक्ष ३ चे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, आदींच्या पथकाने केली.
यापूर्वी तेलंगणातून १२ हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त
मीरा भाईंदर व वसई विरारमध्ये तेलंगणा राज्यातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते याच पार्श्वभूमीवर तेलंगणा राज्यात गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करून कारखाने उध्वस्त केले होते. यात सुमारे ६ हजार किलो ग्रॅम वजनाचे मॅफेड्रोन अमली पदार्थ जप्त केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर या अमली पदार्थांची किंमत १२ हजार कोटी इतकी होती. पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्वात मोठी कारवाई होती.